

Work Life Balance
esakal
नोकरीसाठी साडेचार तासांचा प्रवास करून मी काय गमावतो आहे, याची जाणीव मला झाली. कुटुंब, मुलगा-बायको आणि अर्थात स्वतःसाठीही वेळ नसणं ही भूषणावह गोष्ट नाही, हे कळत गेलं. ज्याच्याकडे स्वतःचा वेळ आहे तो सर्वात श्रीमंत, या लॉजिकच्या जवळपास मी पोहोचलो होतो.
शिक्षण झाल्यानंतर मी नोकरीच्या शोधात होतो. नोकरी झाल्यानंतर छोकरीच्या. दोन्ही मिळाल्यानंतर अजून काहीतरी हवं होतं.
आईवडिलांचं स्वतःचं घर असलं तरीही मला माझा हक्काचा निवारा हवा. घर झाल्यानंतर गाडी हवी. नोकरीत प्रमोशन हवं. ते नसेल मिळत तर नवी नोकरी हवी. पोस्ट वाढलेली हवी. पगार-पॅकेज वाढलेलं हवं. सेविंग्ज भरपूर हवं. बँक बॅलन्स वाढलेला हवा. पोर्टफोलिओ तगडा हवा. कामाचं स्वातंत्र्य हवं. कामाचं समाधानही हवं, म्हणजे हवंच...
एवढ्यावरच ही यादी थांबली नव्हती. समाधानासोबत आपली कुणीतरी दखलही घ्यायला हवी. कौतुक तर हवंच ना यार! चार लोकांनी आपल्याला ओळखलंही पाहिजे. तेही हवं, हेही हवं. सुटायला नको काही. सगळं हवं. मान, सन्मान, प्रतिष्ठा, ओळख, वैभव असं सगळं सगळं हवं. स्वतःला बिझी ठेवणं म्हणजे खूप भारी गोष्ट, असे संस्कार बेमालूमपणे होत गेले. घड्याळाच्या काट्यावर नाचणं म्हणजे फार प्रतिष्ठेची गोष्ट वाटू लागली. या सगळ्या वाटण्याला काही मर्यादा नव्हती. फुलस्टॉप नव्हता. असलाच तर स्वल्पविराम होता. अल्पविरामही नव्हता!
घर छोटं असेल, तर मग मोठ्या घराचे वेध. बाईक असेल तर गाडी घेण्याचे वेध. गाडी छोटी असेल तर मोठी गाडी घेण्याचे वेध. सगळं घेऊन झाल्यानंतर त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर ‘बघा बघा मी कसा आनंदी आहे’ हे मिरवण्याचे वेध. सगळे वेध वेड लावणारे होते. या सगळ्या चक्रातून सुटका करून घ्यावीशी मला का वाटली, या प्रश्नाचं उत्तर शोधायला मला भाग पाडलं माझ्या रोजच्या प्रवासाने!