अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा असल्या तरी आज सर्वांच्या अन्न-वस्त्राची चिंता मिटल्याचे दिसत आहे, मात्र निवारा म्हणजे हक्काच्या घराची चिंता आजही कायम असल्याचे दिसत आहे. त्यासाठीच गेल्या सात दशकांहून अधिक काळापासून म्हाडा कार्यरत असून, त्यांनी आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर अशा प्रमुख शहरांमध्ये परवडणाऱ्या किमतीत घरे दिली आहेत. हीच गृहस्वप्नपूर्तीची परंपरा कायम ठेवत म्हाडा शतकपूर्तीच्या दिशेने दमदार वाटचाल करणार असून, त्याला सरकारी धोरणाचीही जोड असणार आहे. परिणामी नजीकच्या काळात गरजूंच्या घराचे स्पप्न पूर्ण होण्याचा वेग आणखी वाढल्याचे दिसेल असे मत गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केले.