esakal | #BappaMorya ढोलवादनाने प्रसन्न होणारा गणेश
sakal

बोलून बातमी शोधा

Dhol-Tasha

#BappaMorya ढोलवादनाने प्रसन्न होणारा गणेश

sakal_logo
By
पराग ठाकूर

ढोल-ताशा आणि गणपती यांचा नक्की संबंध काय?, गणेशोत्सवात ढोल का वाजवला जातो?, असे प्रश्‍न अनेकदा विचारले जातात. साउंड सिस्टिम आणि गणपती यांचा संबंध नक्कीच नाही. पण, गणपती आणि ढोल यांचा संबंध मात्र नक्कीच आहे. श्री गणेश सहस्त्रनामात ४९९ वे नाव आहे ढक्कानिनादमुदितः. याचा अर्थ आहे, ढोलाच्या निनादाने प्रसन्न होणारा. त्यामुळे श्री गणेशाचे आगमन आणि विसर्जन ढोल-ताशाच्या निनादात केले जाणे स्वाभाविक आहे. 

ढोल हे वाद्य तसे संपूर्ण भारतवर्षात आढळते. विविध राज्यांत कुठे हाताने, कुठे टिपरूने किंवा कुठे काड्यांनी ढोल वाजवला जातो. ताशा किंवा तार्शी हे कर्नाटकात तासे नावाने ओळखले जाते. जम्मू काश्‍मीरमध्ये लोकनृत्त्यात ताशासदृश वाद्याचा वापर केला जातो. महाराष्ट्रात दोन काड्यांनी ताशावादन केले जाते. याच जातकुळीतली वाद्ये अन्य राज्यांमध्येही वाजवली जातात. 

भारतीय संगीत परंपरा प्राचीनतम आहे. डमरू, बासरी, शंख यांना काही कोटी वर्षांचा इतिहास आहे, असे हिंदू संस्कृती मानते. यातीलच लोकसंगीताची पुढील कडी म्हणजे ढोल-ताशा. डमरू, मृदंग, नगारा, दुंदुभी आदी चर्मवाद्यांना तालवाद्य तसेच अवनद्ध वाद्ये म्हणतात. तोंडाने हवा फुंकून वाजवली जाणारी बासरी, सनई आदी वाद्ये ही सुशिर वाद्ये होत. आणि ज्यात लाकडाचे किंवा धातूचे तुकडे एकमेकांवर आपटून ध्वनी निर्माण केला जातो, अशा चिपळ्या, झांज, टाळ वगैरे वाद्यांचा समावेश कंपन वाद्यांमध्ये होतो. ढोल ताशा पथकातील झांजा, लेझीम, टाळ, टोल वगैरे वाद्यांचा समावेश याच कंपन किंवा घन वाद्यांमध्ये होतो. अनेक ढोल-ताशा पथकांमधून वाजविला जाणारा शंख (पांचजन्य) हे देखील रणवाद्य किंवा मंगलवाद्य म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी युद्धाची सुरवात शंखध्वनीने केली जायची. हा शंख जसा युद्धात वाजतो, तसाच मंदिरांमध्ये आरतीच्या वेळीही वाजवला जातो. अर्जुनाचा देवदत्त, युधिष्ठीराचा अनंत विजय, भीमाचा पौण्ड, नकुलाचा सुघोष तर सहदेवाचा मणीपुष्पक शंख यांची नोंद महाभारतात आढळते. वर उल्लेखलेल्या वाद्यांपैकी काही वाद्ये ही केवळ रणवाद्ये होती. तर काही युद्धप्रसंगी आणि अन्य वेळीही वापरली जात. शंख, दुंदुभी आदी वाद्यांचा वापर रणाप्रमाणेच सामाजिक, धार्मिक, उत्सवप्रसंगी केला जात असे. त्याचप्रमाणे ढोल-ताशे, झांजा, शंख यांचाही दोन्ही प्रसंगी वापर होत होता. आज उत्सवाच्या प्रसंगी ढोल-ताशा पथकांकडून या वाद्यांचा वापर केला जातो आहे.