'फ्युजन' कलाविष्काराने बारामती गणेश फेस्टिव्हलचा दिमाखदार प्रारंभ

मिलिंद संगई
Sunday, 27 August 2017

फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या नेहमीच्याच खुसखुशीत शैलात कीर्तन सादर केले. अजित पवार यांच्या हस्ते निवृत्ती महाराजांचा सत्कार करण्यात आला.

बारामती : एकीकडे विठ्ठल विठ्ठलाचा सुरु असलेला जयघोष... दुसरीकडे माउली माऊलीचा होत असलेला जागर आणि ढोल पथक व नृत्याविष्काराचे गणेश वंदनेचे रंगलेले अनोखे फ्युजन... अशा सुंदर कलाविष्काराने यंदाच्या बारामती गणेश फेस्टिव्हलचा दिमाखदार प्रारंभ शनिवारी झाला. 

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करुन या फेस्टिव्हलचा प्रारंभ झाला. नीलीमा नृत्यालयाच्या चाळीस मुलींनी जनहित प्रतिष्ठानच्या ढोल पथकाच्या साथीने सादर केलेल्या फ्युजनने बारामतीकरांच्या डोळ्याचे आणि कानाचेही पारणे फेडले. पंधरा मिनिटांच्या या सादरीकरणाने बारामतीकर मंत्रमुग्ध झाले. 

अजित पवार म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात बारामतीकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा या उद्देशाने (कै.) भाई रणसिंग, जयंत निलाखे यांच्या पुढाकारातून किरण गुजर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा फेस्टिव्हल सुरु केला. त्याला आता सतरा वर्षांचा काळ लोटला. अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम बारामतीकरांना या निमित्ताने पाहता आले याचा उल्लेख करत किरण गुजर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमाचे पवार यांनी कौतुक केले. अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने सामाजिक सलोखा कायम राहतो व नागरिकांच्या अभिरुचीही वाढते असे त्यांनी सांगितले. 

किरण गुजर यांनी प्रास्ताविकात गेल्या सतरा वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. बारामतीकरांनी या फेस्टिव्हलला भरभरुन दाद दिल्यामुळे अतिशय उत्तम रीतीने कार्यक्रम सादर करणे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या नेहमीच्याच खुसखुशीत शैलात कीर्तन सादर केले. अजित पवार यांच्या हस्ते निवृत्ती महाराजांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, सभापती संजय भोसले, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले, तर आभार अॅड. सुनील जगताप यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 baramati ganesh festival fusion