शतकोत्तर रौप्यमहोत्सवी उत्सव शंभर कोटींचा

पांडुरंग सरोदे
Tuesday, 5 September 2017

नोटाबंदी, रेरा, जीएसटीमुळे मंदीचे सावट असतानाही पुणेकरांचा उत्साह कायम

पुणे - नोटाबंदी, बांधकाम व्यावसायिकांसाठीचा ‘रेरा’, जीएसटीसारख्या विविध कारणांचा परिणाम होऊनही तसेच मंदीमुळे मंडळांना जाहिरातींचे पाठबळ मिळालेले नसतानाही यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवामधील आर्थिक उलाढालीने शंभर कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कमी असला, तरी बाप्पाच्या उत्सवामध्ये कुठलीही कमतरता उत्साही पुणेकरांनी जाणवू दिलेली नाही.

नोटाबंदी, रेरा, जीएसटीमुळे मंदीचे सावट असतानाही पुणेकरांचा उत्साह कायम

पुणे - नोटाबंदी, बांधकाम व्यावसायिकांसाठीचा ‘रेरा’, जीएसटीसारख्या विविध कारणांचा परिणाम होऊनही तसेच मंदीमुळे मंडळांना जाहिरातींचे पाठबळ मिळालेले नसतानाही यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवामधील आर्थिक उलाढालीने शंभर कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कमी असला, तरी बाप्पाच्या उत्सवामध्ये कुठलीही कमतरता उत्साही पुणेकरांनी जाणवू दिलेली नाही.

शहरातील व परगावाहून येणाऱ्या हजारो हातांना रोजगार देणारा, कलाकारांना आश्रय देणारा आणि बाजारपेठेमध्ये चैतन्य निर्माण करणारा कालावधी म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव काळात भाविकांनी विविध प्रकारची खरेदी केली. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या मंडळासह छोटे-मोठे देखावे सादर करणाऱ्या मंडळांकडून बाप्पांचे स्वागत, देखावे, पौरोहित्य, विसर्जन मिरवणूक रथापासून ते विविध प्रकारच्या कार्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यावर भर दिला. त्यामुळे एकूणच बाजारपेठेमधील खरेदी आणि आर्थिक उलाढालीला चालना मिळाल्याचे चित्र यंदा दिसले. त्यातूनच यंदाच्या उत्सवात अंदाजे शंभर कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल झाली.

शेखर देडगावकर म्हणाले, ‘‘एका मंडळास दोन कमानी आणि धावत्या मंडपासाठीचे जाहिरातींचे फ्लेक्‍ससाठी किमान तीस हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. दोनशे मोठी मंडळे फ्लेक्‍स करतात.’’

गणेशोत्सवातील धार्मिक विधीसाठी पुरोहित किमान एक हजार रुपये घेतात. शहरात आठशेहून अधिक पुरोहित हा धार्मिक विधी करतात. त्यामुळे पौरोहित्याची उलाढालही मोठी आहे, असे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुरोहित आघाडीचे ऋषीकेश सुमंत व व्यंकटेश फडके यांनी सांगितले.

तन्मय तोडमल म्हणाले, ‘‘बहुतांश मंडळे अहवाल तयार करतात. एका मंडळाला अहवालासाठी किमान ५० हजार रुपये खर्च येतो. त्यातील जाहिरातींचे उत्पन्न वगळता, मंडळांना निम्मे पैसे मिळतात.’’

मोठे देखावे, विसर्जन मिरवणुकीचे रथ तयार करणे अवघड काम आहे. सजावटीचे काम नव्याने करायचे असेल तर त्यास जास्त खर्च होतो, तर तयार देखाव्याला कमी खर्च होतो. या वर्षी दोन्ही प्रकारांना प्राधान्य देण्यात आले. सजावटीसाठी किमान पाच-सहा लाखांपर्यंत खर्च होतो. यंदा शहरातील दोनशेहून अधिक मंडळांनी मोठे देखावे केले.
- विवेक खटावकर, शिल्पकार  

दहीहंडीपासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत ढोल-ताशा पथकांना मागणी असते. स्थिर वादनालाही काही प्रमाणात पैसे मिळतात. यंदा वेगवेगळ्या कारणांमुळे मंडळांनी खर्च कमी केला आहे. त्यामुळे ढोल-ताशाची उलाढाल मागील वर्षीच्या तुलनेत कमी असली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र तितकाच आहे.
- पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघ

गणेशोत्सवातील आर्थिक उलाढाल 
आकडे कोटींत

गणेशमूर्ती    ४
देखावे    २२
नारळ    १५  
ध्वनी व प्रकाश    १३
अहवाल    ९  
प्रसाद     ७
फुले    ७
मंडप    ६ 
पौरोहित्य    ५ 
ढोल-ताशा पथके    ४ 
फ्लेक्‍स    ३
बॅन्डपथके    २ 
अन्य खर्च    ३ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 pune ganesh utsav