चिमुकल्या ‘गौरीं’चा सन्मान हवा...

चिमुकल्या ‘गौरीं’चा सन्मान हवा...

गणेशाचे आगमन झाले, की प्रतीक्षा असते ती गौरींच्या आगमनाची. घरोघरी गणपती बाप्पासोबतच गौरींचीही पूजा मोठ्या भक्तिभावाने बांधली जात असते. गौरी अर्थात महिलांचे प्रतीक. पण गौरींच्या रूपात महिलांना जो ‘प्रतीकात्मक’ सन्मान समाजात दिला जातो, तो प्रत्यक्ष जगताना मिळतो का, हा मात्र प्रश्‍नच आहे. गौरींचा जसा सन्मान केला जातो तसाच मुलींना सन्मानाने जन्माला येऊ देणे व त्यांचे आयुष्य फुलविणे हाच खरा स्त्री-जन्माचा सन्मान आहे, असे मत विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

मेधा पाटकर, सामाजिक कार्यकर्त्या 
स्त्री  -पुरुष समानता ही बाब मानवाधिकाराच्या कक्षेत येते. स्त्रीला सन्मान किंवा प्रतिष्ठा दिली जात नाही, जन्मापासूनच स्त्री-पुरुष असा भेदभाव मानला जातो, हे स्पष्ट आहे. घटनेने स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार, हक्क बहाल केले आहेतच; परंतु त्या पद्धतीने तिला जगू दिले जात नाही, हे वास्तव आहे. आज अनेक स्त्रिया शिक्षणासह इतर क्षेत्रात पुढे येत असल्या, तरी ‘तिची क्षमता कमी आहे’, ‘ती अबला आहे’, असे पुरुषप्रधान संस्कृतीत मानले जाते. स्त्री-शक्तीची जाणीव होते, त्या वेळी आपली सत्ता हिरावून घेतली जाते की काय, अशी भीती पुरुषांनी वाटू लागते. मग, पुरुष स्त्रियांना दाबतात आणि तिला पुढे जाऊ देत नाहीत, हे आधुनिक युगातही घडत आहे. हा भेद नष्ट करण्यासाठी स्त्रियांचा विविध क्षेत्रांतील पुढाकार सकारात्मक पद्धतीने समाजासमोर आणला पाहिजे. स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य लहानपणापासून रुजवायला हवे. स्त्रीचा सन्मान व्हावा, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. स्त्रीवादी दृष्टिकोन लक्षात घेऊन धोरणे आखण्यात यावीत.

विजया राजाध्यक्ष, ज्येष्ठ लेखिका 
आपण गणपतीबरोबरच गौरीलाही स्थान देतो. ही एक परंपरा असली तरी गौरीलासुद्धा गणपतीप्रमाणेच मानाचे स्थान आहे. मग आपण प्रत्यक्ष जगताना ‘गौरी’ला म्हणजे स्त्रीला मानाचे स्थान देतो का, तिचा आदर करतो का, विशेष म्हणजे मुलीच्या जन्माचे स्वागत करतो का? याचा विचार करताना खंत व्यक्त करावी, अशी स्थिती आहे; पण फक्त खंतच व्यक्त करावी असे समाजातील चित्र आहे, असे मला म्हणायचे नाही. समाजात वेगवेगळ्या पातळ्यांवर स्त्रियांना प्रतिष्ठा मिळावी, तिच्या कार्याचा सन्मान व्हावा, तिच्या जन्माचे स्वागत व्हावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यशही मिळताना दिसत आहे. हे प्रयत्न अधिक व्यापक व्हावेत. कायदे करून-शिक्षा करूनच हा प्रश्‍न सुटेल असे नाही. यासाठी लोकशिक्षणाची गरज आहे. मुलगा-मुलगी हा भेद आता मिटला पाहिजे. आई-वडिलांना केवळ मुलेच सांभाळतात, असे नाही. मुलीसुद्धा त्यांना सांभाळतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. ती पुढे आली पाहिजेत.

देवकी पंडित, गायिका 
ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण अजूनही कमी आहे. मुलगी दहा-बारा वर्षांची झाली की तिचे शिक्षण थांबवले जाते. काही वर्षांनी तिचे लग्न लावले जाते. ग्रामीण भारतात अजूनही हे घडत आहे. हे चित्र प्रथम बदलले पाहिजे. मुलींना शिकवले गेले पाहिजे. त्यासाठी पालकांमध्ये जागृती आणण्याची आवश्‍यकता आहे. मुली स्वावलंबी झाल्या तर त्यांना भविष्यात येणाऱ्या अनेक अडचणींशी मुकाबला करणे सहज शक्‍य होईल; पण आपण कुठल्याही समस्येच्या मुळापर्यंत जात नाही. स्त्रियांना सन्मान नाही, मुलीच्या जन्माचे स्वागत नाही म्हणतो. फक्त कायदे करून हे प्रश्‍न सुटणार नाहीत. व्यापक शिक्षणाची, प्रबोधनाची आवश्‍यकता आहे. ग्लॅमरस क्षेत्रापेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या आणि तळागाळात सामाजिक काम करणाऱ्या, धडपडणाऱ्या स्त्रिया या आदर्श म्हणून समाजासमोर आणायला हव्यात, तरच समाजाची मानसिकता बदलेल.

सावनी शेंडे, गायिका  
महिलांचा सन्मान हा मुद्दा सध्याच्या काळात अतीव महत्त्वाचा ठरत चालला आहे. त्याची गरजही आहेच. आपल्याकडे स्त्री-शक्तीविषयी नुसते बोलले जाते. महिलांना अधिकार मिळावा, महिलांना सन्मान मिळावा, अशा गोष्टी अनेकदा केवळ बोलायच्या म्हणून बोलल्या जातात. पण, यात प्रत्यक्ष कृती मात्र खूप कमी वेळा पाहायला मिळते. आजही जागोजागी स्त्री-पुरुष भेदभाव पाहायला मिळतोच मिळतो. ही परिस्थिती बदलणे महिलांच्या उत्कर्षासाठी आवश्‍यक आहे. मुळात ही भेदभावाची दृष्टी बदलणे, हे स्त्री सन्मानाकडे टाकलेले पहिले पाऊल ठरेल. एखादे काम पुरुषाने केले आहे की महिलेने, यापेक्षा त्या कामाची ओळख ही त्याच्या गुणवत्तेवरून केली जाणे गरजेचे आहे. दुसऱ्या बाजूला, मुलींनीसुद्धा स्वतःच्या रक्षणाआधी स्वतःची आदर्श वागणूक प्रस्थापित केली पाहिजे, हेही खरेच. असे केल्याने लोकांची मस्तकं आपोआप नमतात. महत्त्वाचे म्हणजे स्त्रीने स्त्रीचा मान राखणेही आवश्‍यक ठरते.

अंजली भागवत, नेमबाज
खेळच नव्हे विविध क्षेत्रांतील महिलांचे योगदान नक्कीच कौतुकास्पद आहे. याचा अर्थ मला पुरुष आणि स्त्रिया यांच्यात भेद करायचा नाही. फक्त स्त्रियासुद्धा सक्षम आहेत, हे नोंदवायचे आहे. स्त्रियांवर एखादी जबाबदारी सोपवल्यास किंवा त्यांनी एखादी जबाबदारी मनापासून स्वीकारल्यास ती तळमळीने निभावणे, यात आजच्या महिला सरस आहेत. आपल्या बलस्थानांचा वापर करून स्त्रिया वेगळा ठसा उमटवत आहेत. हे सकारात्मक चित्र समाजासमोर आणले पाहिजे. अशा स्त्रियांकडे आदर्श म्हणून पाहायला हवे. अशा वेगवेगळ्या, छोट्या-छोट्या उदाहरणांमधून आपण स्त्रियांचे महत्त्व पटवून द्यायला हवे. त्यामुळे ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ असे सांगण्याची वेळच आपल्यावर येणार नाही.

रश्‍मी शुक्‍ला, पोलिस आयुक्त
स्त्री  भ्रूणहत्या हा ज्वलंत सामाजिक प्रश्‍न आहे. यामुळे मुलींचा जन्मदर घटत चालला आहे. ही चिंतेची बाब आहे. मुलींची संख्या कमी झाली तर पुढे आणखी मोठे प्रश्‍न उद्‌भवू शकतात. म्हणून स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी व्यापक मोहीम राबवली पाहिजे. या संदर्भातील कायद्यांची पोलिसांकडून परिणामकारक अंमलबजावणी व्हायला हवी. समाजातील सर्व घटकांनीही व्यापक जनजागृती करायला हवी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, समाजात मुलगा-मुलगी असा भेद होऊ नये. दोघांना समान दर्जा मिळाला पाहिजे. मुलगी दोन्ही घरांचा विचार करते. कुटुंबांच्या विकासात तिचे मोठे योगदान असते. ज्या दिवशी मुलगा-मुलगी या दोघांत भेदभाव नसेल त्या दिवशी हा प्रश्‍न सुटेल. यासाठी समाजाने आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.

मीरा बोरवणकर, आयपीएस अधिकारी
पूर्वी महिलांना समाजात सन्मान मिळतच नसल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत बदलत गेले आहे, हे मान्य कराला काहीच हरकत नाही. आता मुलींच्या शिक्षणास कुटुंबात महत्त्व दिले जात आहे. नोकरीसाठीही महिलांना प्रोत्साहन मिळू लागले आहे. तथापि, शहरी आणि ग्रामीण भागात अजूनही ही वेगवेगळी परिस्थिती पाहायला मिळते. सध्या महिलांच्या संदर्भात होणाऱ्या गुन्ह्यांत झालेली वाढ चिंताजनक म्हणायला हवी. विशेषतः ॲसिड हल्ले, छेडछाड, एकतर्फी प्रेमातून होणारा हिंसाचार, साखळीचोरी असे सार्वजनिक ठिकाणांवर होणारे गुन्हे वाढत आहेत. अशा वेळी केवळ पोलिसच नव्हे, तर नागरिकांनीही महिलांच्या सुरक्षेसाठी पुढे येण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com