ते आले, त्यांनी वाजवले आणि ते जिंकलेही!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 September 2017

कलावंत ढोल- ताशा पथकाला पाहण्यासाठी गर्दी
पुणे - मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या दर्शनासाठी केवढी उत्सुकता भाविकांच्या डोळ्यांत आणि मनात दाटून असते, हे कुणाला वेगळे सांगायला नकोच. पण, गणेश विसर्जन सोहळ्यात आपल्या लाडक्‍या ग्रामदैवताच्या दर्शनासोबतच त्याच्या पुढ्यात आपल्या ढोल- ताशा वादनाची सेवा रुजू करणाऱ्या कलावंतांना पाहायला आणि ऐकायलाही भाविकांची उत्सुकता मंगळवारी शिगेला पोचली असल्याचे जाणवले.

‘कलावंत पथका’तील कलाकार लोकांच्या प्रतिसादासोबतच वाजवत राहिले; वाजवत राहिले... अन्‌ लोकही न थांबता प्रतिसाद देतच राहिले... हे कलाकार आले, त्यांनी वाजवले आणि भाविकांना जिंकले; असेच हे देखणे चित्र होते !

मराठी कलाकारांनी एकत्र येत तयार केलेल्या ‘कलावंत’ पथकाच्या अप्रतिम अशा ढोल- ताशा वादनाच्या माध्यमातून लोकांना हा अनुभव घेता आला. लयबद्ध तालावर एका रांगेत, एकसारख्या पेहरावातील ही ढोल- ताशा पथकातील कलाकार मंडळी जशी वादन करू लागली, तसे बघणाऱ्यांचे पाय जागेवरच थिरकायला सुरवात झाली ! आपल्या लाडक्‍या मराठी सिनेतारकांना अशाप्रकारे एकत्र आणि थेट आपल्यात पाहायला मिळतेय, हे पाहून लोकांनी ‘कलावंत’ पथकाभोवती मोठी गर्दी केली होती. यंदा या पथकाचे चौथे वर्ष होते.

पथकाच्या कलाकारांचे वादन अनुभवण्यासाठी आणि मुख्यतः आपल्या आवडत्या कलाकारांची एकतरी झलक टिपता यावी, यासाठी लोकांनी लक्ष्मी रस्त्यावर तुडुंब गर्दी केली होती. पांढऱ्या सलवार- कुर्त्यातील कलाकार जसजसे तयारीने वाजवत गेले, तसतशी लोकांच्या जल्लोषातही वाढ होत गेली. पथकात कलाकारांसह दिग्दर्शक, तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्ट, बॅकस्टेज कलाकारांसह काही डॉक्‍टर, आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांचाही सहभाग होता. अमित रानडे, सौरभ गोखले, अनुजा साठे, आस्ताद काळे, श्रीकर पित्रे, सिद्धेश्‍वर झाडबुके, ऋषिकेश वांबुरकर, शाश्‍वती पिंपळीकर, स्वप्नाली पाटील, शाल्मली टोलये, प्राजक्ता माळी या पथकात सहभागी झाले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 pune ganesh visarjan