जनसागर लोटला

जनसागर लोटला

ढोल-ताशांच्या दणदणाटासह ‘बाप्पा’ला निरोप

विसर्जन मिरवणुकीची २८ तासांनी सांगता

पुणे - ढोल-ताशांचा दणदणाट, सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची चौफेर उधळण,   ‘मोरयाऽऽ मोरयाऽऽ’चा जयघोष करत वादकांना भाविकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद, नानाविध रूपांतील गणरायाचा थाट, उकाडा वाढत असतानाही या जल्लोषी वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी लोटलेला भक्तांचा जनसागर, अशा भक्तिमय वातावरणात शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची २८ तासांच्या मिरवणुकीने बुधवारी  सांगता झाली.

मानाचा गणपतींची विसर्जन मिरवणूक सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरू झाली. त्याआधीपासूनच शहराच्या मध्यभागातील रस्ते ‘गणरंगा’त न्हाऊन निघाले होते. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’ची आरती झाल्यानंतर मुख्य विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार सुरेश कलमाडी, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, नीलम गोऱ्हे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी उपस्थित होते. मिरवणूक सुरू होण्यापूर्वी सकाळी साडेसात वाजल्यापासून लक्ष्मी रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यास सुरवात झाली होती. मानाच्या गणपतींची जवळपास नऊ तास मिरवणूक रंगली.

मानाचा पहिला कसबा गणपती
सनईवादनाने सुरवात

फुलांनी सजवलेल्या चांदीच्या पालखीतून ‘श्रीं’ची मिरवणूक काढण्यात आली. प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन, देवळणकर बंधूंच्या नगारावादनाने मिरवणूक महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्यापासून लक्ष्मी मार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली. प्रभात बॅंड, रमणबाग प्रशाला, कलावंत, कामायनी विद्या मंदिरचे ढोल-ताशा पथकांनी जल्लोषपूर्ण वादन केले. दानोत्सव, आर्ट ऑफ लिव्हिंगची जनजागृती, प्रशांती कॅन्सरतर्फे कर्करोगावर जागृती करणारी विविध पथके सहभागी झाली होती. दहा ते बारा देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विदेशी नागरिकांचा सहभाग असणारे ‘रोटरी क्‍लब’चे पथकही वैशिष्ट्यपूर्ण होते. महिलांचे पथकही मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मिरवणुकीस सुरवात : सकाळी १०
विसर्जनाची वेळ : दुपारी ४.०१

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्‍वरी
‘स्त्रीशक्ती’चे दर्शन

फुलांनी सजवलेल्या चांदीच्या पालखीत पगडी घातलेली तांबडी जोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची मूर्ती मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पालखीत विराजमान झालेल्या ‘बाप्पा’चे दर्शन घेण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती. फुलांची उधळण करत या मिरवणुकीला सुरवात झाली. ताल, शिवमुद्रा, शौर्य, न्यू गंधर्व बॅंड पथकांनी मंडळाच्या मिरवणुकीत रंगत आणली. पथकांचे वादन सुरू असताना उपस्थितांनी ठेका धरला. याचवेळी बालशिवाजीच्या वेशातील लहान मुलांसोबत अनेकांनी ‘सेल्फी’ काढण्याचा आनंद लुटला. या मिरवणुकीत स्त्री शक्तीच्या धाडसाचे दर्शन घडले. ईशान्य भारतातील नागरिकांच्या पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मिरवणुकीस सुरवात : सकाळी ११
विसर्जनाची वेळ : सायंकाळी ५.३२ 

मानाचा तिसरा गुरुजी तालीम
गुलालाची उधळण....

दरवर्षीप्रमाणे यंदाही गुलालाची उधळण करत गुरुजी तालीम मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीस सुरवात झाली. चेतक, नादब्रह्म, शिवगर्जना या पथकांबरोबरच नगाराबंधूंचा सनई-चौघडा गणेशभक्तांची गर्दी खेचून घेणारा ठरला. पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी लेझीमचे सादरीकरण केले. फुलांनी सजविलेल्या रथात मुषकावर विराजमान झालेल्या ‘बाप्पा’चे विसर्जन मिरवणुकीत आगमन होताच ‘मोरयाऽ...मोरयाऽऽ’चा जयघोष... अन्‌ आसमंतात गुलालाची मुक्त उधळण करत ही मिरवणूक सावकाशपणे पुढे सरकत होती. मंडळाने यंदाही बाप्पाभोवती सुरक्षारक्षकांचे कडे केले होते.

मिरवणुकीस सुरवात ः दुपारी १२.१५
विसर्जनाची वेळ : सायंकाळी ६.११ 

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
भव्य गरुडरथ

कागदी फुलांची उधळण... महिलांचा फुगड्यांचा खेळ... ढोल-ताशा पथकांचे नादमय वादन... लहानांबरोबर मोठ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अशा उत्साहपूर्ण वातावरणात तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाच्या सर्वांगसुंदर ‘बाप्पा’चे विसर्जन मिरवणुकीत आगमन झाले आणि परिसरात कॅमेरांचा ‘क्‍लिकक्‍लिकाट’ सुरू झाला. नानाविध रंगांच्या नैसर्गिक फुलांनी बनवलेला गरुड रथ आणि त्यावर विराजमान बाप्पांची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेत होती. लोणकर बंधूंच्या नगारावादनाने मिरवणुकीत रंगत आणली. स्वरूपवर्धिनी पथकातील मुलांनी वादनासह विविध खेळ सादर केले. मल्लखांबाचे प्रात्यक्षिक वैशिष्ट्यपूर्ण ठरले. श्री गजलक्ष्मीचे ढोल-ताशा वादन, हिंद तरुण मंडळाचे ढोल, लेझीम, झांज वादनाने उपस्थितांचे लक्ष वेधले.
मिरवणुकीस सुरवात ः दुपारी १२.४५
विसर्जनाची वेळ : सायंकाळी ६.५० 

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
‘जय श्रीराम’चा जयघोष

बिडवे बंधूंच्या नादमधुर सनई वादनाने केसरी-मराठा ट्रस्टच्या केसरीवाडा गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. त्यानंतर समर्थ पथकाने मुलींची तलवार बाजीची प्रात्यक्षिके दाखवून स्त्री शक्तीकडे लक्ष वेधले. या पथकात पुणेरी पगडी घातलेले वादक सहभागी झाले होते. इतिहासप्रेमी मंडळाने स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांच्या भेटीवर आधारित देखावा सादर केला. शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाने दमदार वादन केले. श्रीराम पथकाने ‘जय श्री राम’ अशा घोषणा देत वादनात अधिक रंगत आणली. नदी संवर्धनाबाबत जनजागृती करणारे पथक वैशिष्ट्यपूर्ण ठरले. 
मिरवणुकीस सुरवात : दुपारी १.१०
विसर्जनाची वेळ : सायंकाळी ७.२८

भाऊसाहेब रंगारी - पहाटे ५.३०   
अखिल मंडई गणपती - सकाळी ६.४५
श्रीमंत दगडूशेठ हलवाई - सकाळी ७.५५ 

गेल्या दहा वर्षांतील विसर्जन कालावधी
२०१७    :    २८ तास पाच मिनिटे
२०१६    :    २८ तास ३० मिनिटे 
२०१५    :    २८ तास २५ मिनिटे 
२०१४    :    २९ तास १२ मिनिटे 
२०१३    :    २९ तास २५ मिनिटे 
२०१२    :    २९ तास 
२०११    :    २७ तास २० मिनिटे 
२०१०    :    २७ तास २५ मिनिटे 
२००९    :    २५ तास ४५ मिनिटे 
२००८    :    २८ तास १५ मिनिटे 
२००७    :    ३० तास २० मिनिटे 
२००६    :    २९ तास ३० मिनिटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com