मानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन

मानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन

पुणे - भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला (मंगळवार, ता. ५) होत आहे. बाप्पाला निरोप देण्याकरिता चांदीची पालखी, रथ फुलांनी सजविण्यात येत आहेत. मुख्य मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकापासून सुरू होईल.

बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याने गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, कुंटे चौक, उंबऱ्या गणपती चौक, देशभक्त भाऊसाहेब गोखले चौक, शेडगे विठोबा चौक, श्रीगरुड गणपती चौक (होळकर चौक), आझाद मित्र मंडळ चौक ते टिळक चौकातून संभाजी पूल (लकडी पूल)मार्गे विसर्जन घाटाकडे मार्गस्थ होईल. मानाच्या श्रींच्या मूर्तींचे विसर्जन हौदातील पाण्यात करण्याचा निर्णय मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला.

मुख्य मिरवणुकीची जय्यत तयारी 
उद्या सकाळी १०.३० ला सुरवात 
ढोल-ताशा पथके सज्ज

कसबा गणपती
‘श्रीं’ची मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघेल. सकाळी साडेआठ वाजता ही पालखी मुख्य मिरवणूक मार्गाकडे प्रस्थान ठेवेल. सनईवादन डॉ. प्रमोद गायकवाड यांचे, तर नगारावादन देवळणकर बंधूंचे असेल. प्रभात बॅंड, रमणबाग प्रशाला आणि कामायनी विद्यामंदिरचे ढोल-ताशा पथक असेल. आर्ट ऑफ लिव्हिंग, रोटरी क्‍लब पुणे सिंहगड रस्ता, बॅंक ऑफ इंडिया यांच्यासह महिलांचे पथकही असेल, अशी माहिती स्वागताध्यक्ष मंदार देशपांडे यांनी दिली.
विसर्जन स्थळ - नटेश्‍वर घाट

तांबडी जोगेश्‍वरी 
‘श्रीं’ची मिरवणूक सकाळी नऊ वाजता चांदीच्या पालखीत उत्सव मंडपातून मुख्य मार्गाकडे मार्गस्थ होईल. यात सतीश आढाव यांचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅंड, अश्‍वपथक, सिंबायोसिस ईशान्य केंद्राच्या पूर्वोत्तर राज्यांतील विद्यार्थी लोककला सादर करतील. शौर्य, शिवमुद्रा, ताल ढोल-ताशा पथके असतील. पारंपरिक वेशभूषेत महिला व पुरुष मिरवणुकीच्या लवाजम्यासमवेत असतील, अशी माहिती अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी दिली.
विसर्जन स्थळ - नटेश्‍वर घाट

गुरुजी तालीम मंडळ
‘श्रीं’च्या मिरवणुकीसाठी मंडळाने यंदा पारंपरिक वाद्य असलेला फुलांचा रथ तयार केला आहे. त्यावर श्रीं’ची मूर्ती विराजमान होईल. जयंत नगरकर यांचे नगारावादन आणि नादब्रह्म, चेतक स्पोर्टस्‌ क्‍लब, शिवगर्जना पथके असतील. सुभाष आणि स्वप्नील सरपाले यांची फुलांची सजावट असेल, अशी माहिती अध्यक्ष प्रवीण परदेशी आणि पृथ्वीराज परदेशी यांनी दिली.  ढोल-ताशांच्या निनादात भव्य आणि दिमाखदार पद्धतीने मिरवणुकीची परंपरा मंडळाने कायम राखली आहे. फुलांच्या आकर्षक रथात ‘श्रीं’ची मूर्ती असेल. 
विसर्जन स्थळ - नटेश्‍वर घाट

तुळशीबाग 
‘श्रीं’ची विसर्जन मिरवणूक २४ फूट उंचीच्या ‘गरुड रथा’मधून काढण्यात येणार आहे. रथाला फुलांची सजावट करण्यात आलेली असून, रथ १६ फूट लांब व १८ फूट रुंद असणार आहे. लोणकर बंधूंचे नगारावादन आणि हिंद तरुण मंडळाचा गावठी ताल, गजलक्ष्मी, स्वरूपवर्धिनी ढोल-ताशा, ध्वजपथक मिरवणुकीची शोभा वाढविणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांकडून मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल, अशी माहिती कोशाध्यक्ष नितीन पंडित यांनी दिली.
विसर्जन स्थळ - पांचाळेश्‍वर घाट

केसरीवाडा
केसरी- मराठा ट्रस्टच्या केसरीवाड्याचा गणपती पालखी रथात विराजमान होईल. मिरवणुकीत बिडवे बंधूंचे सनई-चौघडावादन आणि शिवमुद्रा, श्रीराम ढोल-ताशा पथके असतील, अशी माहिती संस्थेतर्फे रोहित टिळक यांनी दिली. लोकमान्य टिळकांपासून केसरीवाड्याने पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने मिरवणूक काढण्याची परंपरा कायम राखली आहे. उत्सव मंडपातून ‘श्रीं’चा पालखी रथ शनिपार चौकातून नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकाकडे मुख्य मिरवणूक मार्गाकडे रवाना होईल.
विसर्जन स्थळ - पांचाळेश्‍वर घाट

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट 
‘श्रीं’च्या विसर्जन मिरवणुकीच्या अग्रभागी खळदकर बंधूंचे नगारावादन होणार आहे. पालखी रथात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांची मूर्ती असेल आणि १२६ वर्षांपूर्वीच्या लाकडी रथात ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान करण्यात येणार असून, त्यावर विद्युत रोषणाई असेल. तसेच नादब्रह्म, आवर्तन, श्रीराम ढोल-ताशा पथके या मिरवणुकीत सहभाग घेणार आहेत, अशी माहिती भाऊसाहेब रंगारी गणपती सचिव राजेंद्र गुप्ता यांनी दिली.
विसर्जन स्थळ - आपटे घाट

अखिल मंडई मंडळ 
शारदा गजाननाची आरती सायंकाळी सात वाजता करण्यात येणार असून, त्यानंतर मंडळ मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे. मंडळाने यंदा ३२ फूट जगदंब रथ तयार केलेला असून, या रथावर तुळजाभवानीची मूर्ती विराजमान असणार आहे. खळदकर बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅंड आणि शिवगर्जना, ‘नूमवि’चे ढोल-ताशा पथक मिरवणुकीत सहभागी असेल, अशी माहिती मंडळाचे कोशाध्यक्ष संजय मते यांनी दिली.
विसर्जन स्थळ - पांचाळेश्‍वर घाट

दगडूशेठ गणपती ट्रस्ट
‘श्रीं’ची मिरवणूक यंदा धूम्रवर्ण रथातून निघेल. त्यावर मोतिया रंगाच्या लक्ष लक्ष दिव्यांची रोषणाई आहे. रथावर आठ खांब असून, आकर्षक नक्षीकामाच्या चार कमानी आहेत. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून, उंची २२ फूट आहे. रथावर पाच कळस आहेत. मिरवणुकीच्या अग्रभागी पर्यावरण रथ असून, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक असतील. विनायक देवळणकर यांचे नगारावादन आणि दरबार, प्रभात बॅंड, स्वरूपवर्धिनी ढोल-ताशा पथक असेल, अशी माहिती अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. 
विसर्जन स्थळ - पांचाळेश्‍वर घाट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com