Ganesh Festival : रस्त्यांवर गणेशभक्तांची मांदियाळी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 September 2018

पुणे - बाप्पाला पुष्पहार, फुले, दूर्वा आणि नारळाचे तोरण अर्पण करण्याबरोबरच ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी रविवारी सकाळपासून शहरात बाहेरगावांहून व उपनगरांतून गणेशभक्त येत होते. त्यामुळे मध्यवर्ती भागातील रस्त्यारस्त्यांवर दिवसभर गणेशभक्तांची मांदियाळी दिसत होती. रात्री उशिरापर्यंत पेठांचा भाग गर्दीने गजबजून गेला होता. 

गणेशोत्सवाला सुरवात होऊन पहिलाच रविवार आल्याने चाकरमान्यांनी गणेशदर्शनाबरोबरच देखावे पाहण्याचा आनंद लुटला. मानाच्या पाचही गणपतींना अनेक भाविकांनी नारळाचे तोरण अर्पण केले. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या ‘श्रीं’स नारळाचे तोरण वाहण्यासाठी भाविकांची रांग दुपारी बारापर्यंत बुधवार चौकापर्यंत गेली होती. रात्री उशिरापर्यंत दगडूशेठ हलवाई गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती व अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत होते. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भाग गर्दीने फुलून गेला होता. 

शहरातील विविध रस्त्यांवर सायंकाळनंतर तरुणाई ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष करत होती. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विविध मंडळांचे कार्यकर्ते आवश्‍यक त्या उपाययोजना करत होते. 

देखावे पाहून थकलेल्या भाविकांची पावले खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सकडे वळत होती. नागरिक लहानग्यांसाठी खेळणी उत्साहाने खरेदी करत होते. देखावे पाहण्याचा क्षण अनेक जण मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत होते; तसेच देखाव्यांचे व्हिडिओ काढून आपल्या आप्तस्वकीयांसहित मित्रमैत्रिणींना पाठवित होते. 

मी माझ्या कुटुंबीयांसमवेत मांजरीहून देखावे पाहण्यासाठी आलो आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात आल्याशिवाय गणेशोत्सवाचा व देखावे पाहण्याचा आनंद मिळत नाही. तो आनंद प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आज आलो आहे.
- सुनील यादव, स्थापत्य अभियंता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival ganeshotsav Ganpati Decoration