गणपती स्पर्धेत ‘सनसिटी सोसायटी’ची बाजी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 September 2017

भारतीय सैन्य दलाच्या कार्याचा गौरव करणारा देखावा; तब्बल एक महिना मेहनत

भारतीय सैन्य दलाच्या कार्याचा गौरव करणारा देखावा; तब्बल एक महिना मेहनत

पुणे - टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेली ‘आयएनएस विराट’ ही युद्धनौका... शस्त्रास्त्रांच्या प्रतिकृतीतून दिलेली सैन्य दलाची माहिती अन्‌ भित्तीपत्रकांतून जवानांच्या कार्याला केलेला सलाम...अशा लहान मुले आणि तरुणांनी एकत्र येऊन तयार केलेल्या सिंहगड रस्त्यावरील ‘सनसिटी सोसायटी’च्या देखाव्याने सोसायटी गणपती स्पर्धेत बाजी मारली आहे. भारतीय सैन्य दलाच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या देखाव्याने ‘सकाळ’च्या सोसायटी गणपती स्पर्धेचा प्रथम क्रमांक पटकावला आहे. सैन्य दलातील जवान, त्यांचे कार्य, त्यांच्या क्षमता आणि नव्या तरुणांनी सैन्यात भरती का व्हावे, याविषयीची माहिती उलगडणारा हा देखावा स्पर्धेत लक्षवेधी ठरला असून, सोसायटीतील लहान मुले आणि तरुणांनी एक महिन्याच्या मेहनतीतून हा देखावा साकारला आहे. सोसायटीने यंदा ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा देखावा तयार केला होता. 

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सकाळ’ आणि ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी’तर्फे सोसायटी गणपती स्पर्धा आयोजिली होती. त्यात सिंहगड रस्त्यावरील सनसिटी सोसायटीच्या देखाव्याने स्पर्धेचे पारितोषिक पटकावले. ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी’चे विभागीय व्यवस्थापक विजय वाघ आणि ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’चे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांच्या हस्ते सोसायटीच्या प्रतिनिधींना पारितोषिक देण्यात आले.

सोसायटीच्या उत्सव समितीचे समीर रुपदे यांनी पारितोषिक स्वीकारले. या वेळी ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’च्या सहायक प्रादेशिक व्यवस्थापक हर्षद झोडगे, धायरी शाखेचे व्यवस्थापक किरण येनपुरे, एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीचे सचिन वडारकर आणि अमित ओक उपस्थित होते.

रुपदे म्हणाले, ‘‘सकाळ’ने आयोजिलेल्या उपक्रमात सहभागी होऊन खूप छान वाटले. त्यात आम्हाला स्पर्धेचे पारितोषिक मिळाले, त्याचाही आनंद आहे. अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत, ज्यातून लोकांचे कलागुण पाहायला मिळतात. ‘सकाळ’ने सोसायट्यांना ही संधी दिली, त्याचे कौतुक आहेच. आमचा देखावा तयार करण्यात लहान मुले आणि तरुणांचा सहभाग होता. हे पारितोषिक कोणा एकाचे नसून त्यात प्रत्येकाची मेहनत आहे.’’

‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी’ हे उपक्रमाचे मुख्य प्रायोजक होते. तर ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ हे सहप्रायोजक होते. ‘द पिनॅकल इव्हेंट्‌स’च्या प्रतिनिधींनी आणि लहान मुलांनी चित्रपट गीतांवर ठेका धरला. संतोष साकोरे यांनी सूत्रसंचालन केले.

टाकाऊ वस्तूंतून देखावा
सिंहगड रस्त्यावरील सनसिटी सोसायटीतील लहान मुले आणि तरुणाईने एकत्र येऊन हा देखावा साकारला आहे. टाकाऊ वस्तूंचा वापर करून हा देखावा तयार केला आहे. सैन्य दलाविषयी संपूर्ण माहिती देण्यासह लहान मुले आणि तरुणांनी सैन्य दलाबद्दलची कृतज्ञता या देखाव्याद्वारे व्यक्त केली आहे. खास करून यात लहान मुलांचा सहभाग मोठा होता. अगदी ‘आयएनएस विराट’ ही युद्धनौका बनविण्यापासून ते शस्त्रास्त्रांच्या प्रतिकृती तयार करण्यापर्यंतच्या कामात लहान मुलांनी भाग घेतला. सैन्य दलाविषयी माहिती गोळा करण्यापासून ते भित्तिपत्रक तयार करण्यापर्यंत सोसायटीतील प्रत्येकाने एकत्र येऊन या देखाव्यासाठी मदत केली. त्रिशूल युद्धनौका, अर्जुन रणगाडा, तेजस विमान यांची पर्यावरणपूरक प्रतिकृती तयार केली आहे. 

मृण्मयीकडून परीक्षण
‘सकाळ’ सोसायटी गणपती स्पर्धेदरम्यान अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी सिंहगड रस्ता, कोथरूड, बिबवेवाडी, सहकारनगर आणि नऱ्हे येथील सोसायट्यांना भेट दिली. या सोसायट्यांमध्ये जाऊन देखाव्यांचे परीक्षण केले. या स्पर्धेला सोसायट्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘सकाळ’ने आयोजित केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य होता. आम्हालाही या उपक्रमातून लोकांपर्यंत पोचता आले. सोसायट्यांचा उत्साहही पाहायला मिळाला. लोकांनी एकत्र येऊन तयार केलेले देखावे आवडले. यातून लोकांमधील एकोपा वाढण्यासह त्यांचा गणेशोत्सवाचा एक वेगळाच रंग अनुभवायला मिळाला. या उपक्रमातून सोसायट्यांमधील तरुणाईला त्यांचे कलागुण दाखवता आले. आमच्या कंपनीचे ब्रीदवाक्‍य ‘सेलिब्रेट लाइफ’ असे आहे. या स्पर्धेतून हेच पाहायला मिळाले.
- विजय वाघ, विभागीय व्यवस्थापक, एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी

‘सकाळ’च्या उपक्रमाला सोसायट्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोसायटीतील रहिवाशांनी केलेले देखावे पाहून खूप छान वाटले. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचा उत्साह आणि आनंद पाहता आला. ‘सकाळ’ नेहमीच वेगळे उपक्रम राबवत आला आहे. सध्या लोकांमध्ये एकोपा नाही. पण, या स्पर्धेच्या निमित्ताने लोक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. स्पर्धेला मिळालेला प्रतिसादही वाखाणण्याजोगा होता.
- सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news ganesh festival 2017 ganpati competition