esakal | सोसायटीतील रहिवाशांशी मनमोकळा संवाद आणि बाप्पांचा जयघोष
sakal

बोलून बातमी शोधा

सोसायटीतील रहिवाशांशी मनमोकळा संवाद आणि बाप्पांचा जयघोष

सोसायटीतील रहिवाशांशी मनमोकळा संवाद आणि बाप्पांचा जयघोष

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया...’चा जयघोष... सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन केलेली बाप्पाची आरती... अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्यासोबत रहिवाशांनी साधलेला मनमोकळा संवाद अन्‌ त्यांच्यासमवेत सेल्फी टिपणारी तरुणाई अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रविवारी ‘सकाळ’च्या सोसायटी गणपती स्पर्धेचा दुसरा दिवस रंगला. मृण्मयी यांनी सहकारनगर आणि बिबवेवाडी येथील चार सोसायट्यांना भेट देत रहिवाशांनी एकत्र येऊन तयार केलेले देखावे पाहिले अन्‌ एकत्रित येऊन सोसायट्यांनी जपलेली या सांस्कृतिक बंधाचे त्यांनी कौतुकही केले.  

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘सकाळ’ने सोसायटी गणपती स्पर्धा आयोजिली आहे. त्याअंतर्गत स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही मृण्मयी देशपांडे यांनी सोसायट्यांमधील देखाव्यांची पाहणी केली आणि त्यांच्या सामाजिक उपक्रमांची माहितीही घेतली. संतोष साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी’ हे उपक्रमाचे प्रायोजक असून, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे सहप्रायोजक आहेत.

आनंद पार्क सोसायटी (शंकर शेठ रस्ता)
या सोसायटीने देखणी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. या विविध मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा मृण्मयी यांना खूप आवडला. रहिवाशांशी संवाद साधत त्यांच्याबरोबर सेल्फीही काढले. ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी’चे विभागीय व्यवस्थापक विजय वाघ, मिलिंद जावळे, भूषण नाशिककर, विजय नरुला आणि सोसायटीचे जयंत ओसवाल या वेळी उपस्थित होते. 

ऋतुराज हाउसिंग सोसायटी (बिबवेवाडी)
या सोसायटीनेही यावर्षी सुंदर अशी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. हा देखावाही पाहण्यासारखा आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोसायटीने जपलेला एकोपा त्यांच्या मनाला भिडला. सण-उत्सवामुळे रहिवाशांना एकत्र येण्याचे निमित्त मिळते, अशी बोलकी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. सोसायटीचे अभिषेक जगताप, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे कांतिलाल लिपारे उपस्थित होते. 

अखिल सुवर्णनगरी सोसायटी (बिबवेवाडी)
या सोसायटीने यंदा दिल्लीतील इंडिया गेटची प्रतिकृती साकारली आहे. सोसायटीतील लहान मुले आणि तरुणांनी एकत्र येऊन हा देखावा साकारला आहे. मृण्मयी यांनी आरती केल्यानंतर रहिवाशांशी संवाद साधला. सोसायटीने जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत त्यांनी समाजासाठी असेच काम करत राहण्याचे आवाहन केले. ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी’चे अभिषेक बागडे, रवी डोरा, सिद्धेश्‍वर मंदाडे आणि सोसायटीचे जतिन हे उपस्थित होते. 

सहजीवन सोसायटी (सहकारनगर) 
या सोसायटीने साधेपणावर भर दिला असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोसायटीने सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम आयोजित केले आहे. मृण्मयी यांनी रहिवाशांनी वर्षभर राबविलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. तसेच, सण-उत्सवाला असेच एकत्र या आणि सण साजरे करा, असे आवाहनही केले. ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी’चे रितेश सिंग, विशाल हुंडे, गोपाल धनुडे आणि सोसायटीचे अमित कुलकर्णी उपस्थित होते.

गणेशोत्सव आपल्याला एकत्र आणतो. विचारांची देवाण-घेवाण होते आणि त्यातून लोकांमधील ऋणानुबंध आणखीन दृढ होतात. लोकमान्य टिळक यांनी घालून दिलेली गणेशोत्सवाची ही परंपरा अशीच अविरत चालू राहण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत त्याचा वारसा पोचवला पाहिजे. फक्त गणेशोत्सव हा उत्सव म्हणून साजरा न करता त्यातून सामाजिक बांधिलकीही जपावी. 
- मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री