#MarathaKrantiMorcha चाकण हिंसाचार; १५ जणांना कोठडी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 August 2018

पुणे - मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या खेड तालुका बंद आंदोलनानंतर चाकणमध्ये जाळपोळ व हिंसाचार घडविणाऱ्या पंधरा जणांना आठ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यशीला कटारे यांनी याबाबतचा आदेश दिला. या वेळी न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता.

पुणे - मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या खेड तालुका बंद आंदोलनानंतर चाकणमध्ये जाळपोळ व हिंसाचार घडविणाऱ्या पंधरा जणांना आठ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यशीला कटारे यांनी याबाबतचा आदेश दिला. या वेळी न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता.

मराठा आरक्षण आंदोलनावेळी संशयितांनी गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे ग्रामीण पोलिसांना आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे. त्यापैकी तिघेजण अल्पवयीन असून, उर्वरित १५ जणांना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. मनोज दौलत गिरी (वय २३), सूर्यकांत बाळू भोसले (वय २१), अभिषेक विनोद शाह (वय १९), विशाल रमेश राक्षे (वय २६), सत्यम दत्तात्रेय कड (वय १९), रोहिदास काळूराम धनवटे (वय १९), विकास अंकुश नाईकवाडे (वय २८), सोहेल रफिक इनामदार (वय १९),  समीर विलास कड (वय २०), प्रवीण उद्धव गावडे (वय २३), आकाश मारुती कड (वय २५), आनंद दिनेश मांदळे (वय १८), प्रसाद राजाराम खंडेभराड (वय १८, सर्व रा. खेड), परमेश्वर राजेभाऊ शिंदे (वय २२), सचिन दिगंबर आमटे (वय २७, दोघेही रा. बीड) यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पवार यांनी फिर्याद दिली असून, चार ते पाच हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. 

या घटनेत सात पोलिस जखमी झाले आहेत, तर शासकीय व खासगी वाहनांचे आठ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सहायक सरकारी वकील हेमंत मेंडकी व ज्ञानेश्‍वर मोरे यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली, तर बचाव पक्षातर्फे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार, ॲड. मिलिंद पवार, ॲड. एस. आर. घाटगे यांच्यासह अन्य वकिलांनी बाजू मांडली.

पोलिसांचे धडसत्र
चाकण येथील हिंसाचारानंतर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. व्हिडिओ क्‍लीप, मोबाईल शूटिंग, फोटोद्वारे संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. हिंसाचार घडविणाऱ्यांबाबतची माहिती घेण्यासाठी राजकीय नेते, कार्यकर्ते, सरपंच, पोलिस पाटील यांचे सहकार्य घेत आहेत. पोलिस रात्री उशिरा तरुणांच्या घरी जात असल्यामुळे काही तरुण गाव सोडून गेले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chakan Violence; 15 people in custody