Maratha Kranti Morcha: शाळा, महाविद्यालयांना आज सुटी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 August 2018

पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या क्रांतिदिनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय बाजार समित्यांमधील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शाळा बंदसंबंधी जिल्हा परिषदेला आदेश दिला आहे. त्या आदेशानुसार सर्व शाळांना सुटी देण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कुऱ्हाडे यांनी बुधवारी दिली.

पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या क्रांतिदिनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय बाजार समित्यांमधील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शाळा बंदसंबंधी जिल्हा परिषदेला आदेश दिला आहे. त्या आदेशानुसार सर्व शाळांना सुटी देण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कुऱ्हाडे यांनी बुधवारी दिली.

याआधी पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झालेल्या आंदोलनानंतर हिंसक जमावाने जाळपोळ आणि गाड्यांची मोडतोड केली होती. यामध्ये काही स्कूल बसचाही समावेश होता. या जाळपोळीमुळे शालेय विद्यार्थ्यांना धुराचा प्रचंड त्रास झाला होता. त्यामुळे गुरुवारी होत असलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनदिनी शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करावी, अशी मागणी जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्हाधिकारी राम यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती. त्यानुसार ही सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे राम यांनी जिल्हा परिषदेला दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तीन हजार ७१७ प्राथमिक शाळा आहेत. याशिवाय सुमारे साडेतीनशे खासगी प्राथमिक आणि एक हजार २५० माध्यमिक शाळा आहेत.

बाजार समित्यांतील व्यवहारही बंद
बारामती - जळोची उपबाजार येथे गुरुवारी भरणारा भाजी व जनावरांचा बाजार बंद राहणार आहे, असे बाजार समितीने कळविले आहे. हमाल मापाडी, श्रमजीवी घटक, बारामती मर्चंट असोसिएशन, फळे व भाजीपाला व्यापारी संघटना या सर्वांनी मराठा आरक्षणास पाठिंबा दिला असल्याने बाजार बंद राहणार आहे. 

माल विक्रीस आणू नये
चाकण - खेड बाजार समितीने खबरदारीचा उपाय म्हणून उद्या (ता. ९) चाकण आवारातील सकाळचा बाजार बंद ठेवला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले, सचिव सतीश चांभारे यांनी दिली. शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल, मापाडी यांनी ‘बाजार बंद’ची नोंद घ्यावी. शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये. व्यापाऱ्यांनी शेतीमाल खरेदी करण्यासाठी वाहने बाजारात आणू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

व्यापाऱ्यांना आवाहन
राजगुरुनगर - राजगुरुनगर आवारातील संध्याकाळचा बाजार उद्या बंद ठेवला आहे. बाजार समितीच्या राजगुरुनगर आवारात दररोज संध्याकाळी भाजीपाला व तरकारीचा बाजार भरतो. अडते व व्यापारी यांच्या मागणीनुसार राजगुरुनगर आवारातील बाजार बंद ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीकरिता आणू नये आणि शेतीमाल खरेदीकरिता व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डात वाहने आणू नयेत, असे आवाहन केले आहे.

कोरेगावात आठवडे बाजार बंद
कोरेगाव भीमा - सकल मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सणसवाडी औद्योगिक परिसरातील बहुतांश कारखाने; तसेच कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील आठवडे बाजार, परिसरातील शाळाही बंद ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.

खबरदारीचा उपाय म्हणून कोरेगाव भीमा येथे गुरुवारी भरणारा आठवडे बाजारही बंद ठेवण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.

सणसवाडी औद्योगिक परिसरातील बहुतांश उद्योग, तसेच 
परिसरातील शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, बंदकाळात कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवू नये, शांततेत बंद पाळावा, असे आवाहन शिक्रापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शेलार यांनी केले आहे. पूर्व हवेलीतही लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत शांततेत बंद पाळण्याचे, तसेच कोणतीही हानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन लोणीकंदचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी केले आहे.

मंचरमधील अडत्यांचा पाठिंबा
मंचर : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडत-व्यापारी असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गुरुवारी बाजार समितीतील शेतीमालाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहणार आहेत, अशी माहिती कांदा - बटाटा विभागाचे अध्यक्ष संजय मोरे यांनी दिली. कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार उद्या होणार नाहीत, अशी माहिती तरकारी भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha School College Holiday