चाकणच्या हिंसाचारामागे समाजकंटकांचे अदृष्य हात...

विलास काटे
Tuesday, 31 July 2018

राज्यभरात मराठा आंदोलनाला लागलेले हिंसक वळण पाहता चाकण पोलिसांनी आंदोलना दरम्यान दाखविलेला निष्काळजीपणामुळे वातावरण नियंत्रणाबाहेर गेले. एक मात्र नक्की होते की हिंसक घटना करणारे मराठा आंदोलक नाही तर त्यामागचे हात अदृश्य समाजकंटकांचेच होते.

चाकण - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा आंदोलनाची धग चाकणच्या उद्योगनगरीला तिव्र स्वरूपात लागली. पोलिसांच्या गाड्यांसह मालवाहू ट्रक, बस, एसटीसारख्या सुमारे शंभरहून अधिक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. संपूर्ण चाकणमधे तणावाचे वातावरण होते. दरम्यान अचानक झालेल्या हिंसक वातावरणामुळे संशयाची सुई परजिल्ह्यातून आलेले कामगार, चाकणलगतच्या गावातील तरूणांवर व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे स्थानिक नेत्यांच्या राजकिय वर्चस्वासाठी  घडवून आणलेला नियोजनबद्ध कट असल्याची शक्यताही शहरात चर्चिलि जात आहे.

राज्यभरात मराठा आंदोलनाला लागलेले हिंसक वळण पाहता चाकण पोलिसांनी आंदोलना दरम्यान दाखविलेला निष्काळजीपणामुळे वातावरण नियंत्रणाबाहेर गेले. एक मात्र नक्की होते की हिंसक घटना करणारे मराठा आंदोलक नाही तर त्यामागचे हात अदृश्य समाजकंटकांचेच होते.

चाकणमधे मराठा आंदोलनाच्या सभेतच खरी हिंसाचाराची सुरूवात होती. मात्र सभा संपल्यानंतर जमाव उठायला लागला. यावेळी एक महिला कार्यकर्तीने थांबा इथेच लगेच कुठे चालले असे वक्तव्य केले आणि जमाव पुन्हा थांबला. दुसरीकडे एकाने रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीवर दगड मारला आणि बाकींच्यांनी त्याचेच अनुकरण केले. एकेक करता नाशिक महामार्गावरिल अनेक एसटी, बसेस, मालवाहू अवजड वाहनांची जाळपोळ सुरू झाली. पोलिसांच्या गाड्यांही जाळपोळीतून वाचल्या नाहीत. मोबाईलमधे फोटो काढणाऱ्यांनाही मारले जात होते. हिंसक घटना घडविणारे समाजकंटकांच्या हातात लाढ्या, सळई, गज, दगडगोटे होते. रस्त्यावरून जाणाऱ्या एसटी आणि शिवशाहीच्या गाड्या ज्यापद्धतीने रस्त्यात थांबवून स्वता आंदोलक सारथ्य करत होते. यावरून संपूर्ण हिंसक कारवाई ही नियोजनबद्ध असल्याची चर्चा आता शहरात सुरू आहे.

यावरून कुणी त्याला जातिय रंग देत आहे. तर कुणी परजिल्ह्यातून रोजगारासाठी आलेल्या तरूणांनीच हे कृत्य केल्याचे सांगत आहे. तर कुणी स्थानिक राजकिय वर्चस्वातून हे सगळे घडवून आणल्याची चर्चा करत आहे. सर्वसामान्य स्थानिक नागरिक मात्र हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत होते. हिंसा करणारी पोरं कुठली एवढीच चर्चा त्यांच्या ओठी होती.

आंदोलकांनी पोलिसांनाही लक्ष केले. यामधे चाकणचे पोलिस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांच्याबरोबर अनेक पोलिसांना जबरी मार खावा लागला. जमावाने पोलिसांच्या चारचाकी गाड्याही जाळल्या.खरे तर मराठा आंदोलन हे तात्कालिक कारण होते. पोलिसांकडून दैनंदिन कामकाजात केलेल्या जाणिवपूर्व चुका, जमिनीचे व्यवहारातील हस्तक्षेप, राजकिय लोकांच्या सांगण्यावरून दाखल केलेले गुन्हे यातील एकेक उद्रेक म्हणा किंवा पोलिसांवरचा राग  लोकांच्या मनात ठासून होता. तो नेमका आंदोलनाच्या माध्यमातून बाहेर आला आणि पोलिसांना जमावाने सळो की पळो करून सोडले. एवढेच काय ज्या भागात हिंसा करायची त्या भागातील सीसीटीव्ही फूटेजसाठी लावण्यात आलेले कॅमेरेही जमावाने फोडले. पन्नास शंभरच्या गटाने आंदोलक विविध भागात विभागून हल्ला केला जात होता. एकंदर भाड्याने आणलेल्या हल्लेखोरांप्रमाणेच कालचे हिंसक आंदोलन घडवून आणण्यात आल्याची चर्चा शहरात होती. 

वास्तविक नाशिक महामार्गावरील वाहतूक आंदोलनापूर्वीच पोलिसांनी एक किमी थांबविणे आवश्यक होते. राज्यातील इतर ठिकाणीच्या घटना पाहता चाकण पोलिसांचा निष्काळजीपणा पुन्ह उघड झाला. पोलिस आता हिंसक कृत्य करणाऱ्यांना अटक करतील, मारहाण करतील, गुन्हे दाखल करतील. मात्र प्रश्न आहेत पोलिसांनीही आपली मानसिकता बदलावी लागेल. शहरात गुन्हेगारांना पाठीशी घालणे, अवैध धंद्यांतून मिळणारी रक्कम, लाचखोरी यावर पोलिसांनी स्वताहून लांब रहा हा धडाच जणूकाही पोलिसांना कालच्या हिंसक घटनेने मिळाला.

हिंसक घटनेत औद्योगिक वाहने आणि एसटीला मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यात आले. यामुळे एसटीचे नुकसान झालेच मात्र औद्योगिक व्यवहारावरही परिणाम जाणविला. नाशिक महामार्ग गेल्या काही वर्षात अनेक कारणांसाठी अडविण्यात आला. यामुळे औद्योगिक क्षेत्रात चुकिचा संदेश जाण्याची शक्यता आहे. भविष्यात औद्योगिक शहर म्हणून नावाजलेल्या चाकण शहराची ओळख पुसू नये यासाठी पोलिसच, राजकिय आणि स्थानिक लोकांनी आंदोलने करताना तारतम्य भाव ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा राजकिय लाभ करून घेणाऱ्यांच्या मागे जाताना आपली स्वताची हक्काची रोजरोटी कधी बंद होईल याचा नेम नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha kranti morcha there are community spoilers behind chakan chaos