Maratha Kranti Morcha: तरुणाईचा जोर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 August 2018

पुणे, ता. ९ ः आरक्षणासाठी मराठा समाजाने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये तरुण आणि तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. या तरुण-तरुणींनी ‘सकाळ’शी साधलेला संवाद...

पुणे, ता. ९ ः आरक्षणासाठी मराठा समाजाने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये तरुण आणि तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. या तरुण-तरुणींनी ‘सकाळ’शी साधलेला संवाद...

मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले; पण सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्हाला पुन्हा आंदोलने करावे लागत आहे. आज प्रत्येक क्षेत्रांत मराठा समाज पिछाडीवर जात आहे. शिक्षण आणि नोकरी यामध्ये मराठा समाजाच्या मुलांना डावलले जात आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण हवे आहे.
- रोहित वावळ 

मी आंदोलनात सहभागी होण्याचे कारण म्हणजे आमच्याकडे पात्रता असूनही आम्हाला प्रत्येक ठिकाणी डावलले जात आहे. मराठा समाजातील मुलांना ९० टक्के गुण असले, तरी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. त्याचबरोबर शिक्षणासाठी प्रचंड प्रमाणात फी भरावी लागते. 
- आदिती सणस 

मराठा समाजातील मुलांना शिक्षणासाठी अनेक समस्या येत आहेत. त्यामध्ये शिक्षणात राखीव जागा नसणे, शिक्षणासाठी प्रचंड प्रमाणात पैसे भरावे लागणे आणि गुणवत्ता असूनदेखील प्रवेश नाकारणे. तसेच सरकारी नोकरीमध्ये मराठा समाजाला डावलले जात आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण हवे आहे.
- मानसी भुरुक 

आंदोलनात सहभागी होण्याचा उद्देश हा आम्हाला आरक्षण मिळावा, हा आहे. मराठा तरुण हे आज शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मागे पडत आहेत. या तरुणांना पात्रता असूनदेखील शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी प्रवेश नाकारण्यात येत आहे. 
- पूजा चोरगे 

आम्हाला शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण गरजेचे आहे. सामान्य कुटुंबातील विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी किंवा मेडिकलसाठी पात्र असूनदेखील केवळ पैशामुळे प्रवेश घेऊ शकत नाही. तसेच, सरकारी नोकरीमध्ये आरक्षण नसल्याने आम्ही पात्र असूनदेखील आम्हाला नाकारले जात आहे. 
- रोहित पवार 

 मराठा समाजाचे ५८ मोर्चे होऊनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे हे मार्चे पुन्हा निघत आहेत. सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. तसेच, ज्या तरुणांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या घरच्यांना ५० लाख रुपयांची मदत करावी. 
- कर्ण सोनवणे 

सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांस फीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, एकही महाविद्यालय विद्यार्थ्यांना सवलत देत नाही. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज देण्याची घोषणा केली होती. मात्र, बॅंका कर्ज देत नाहीत. त्यामुळे शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना अवघड झाले आहे.
- प्रसाद वाघमारे 

समाजातील उच्च शिक्षित तरुण रस्त्यावर उतरत आहेत. याची तरी सरकारने दखल घ्यावी. आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. 
- मनोज गायकवाड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Martha Kranti Morcha maratha reservation agitation #MaharashtraBandh