Maratha Kranti Morcha: पिंपरी १०० टक्के ‘बंद’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 August 2018

पिंपरी - बंद असलेली दुकाने, ओस पडलेले रस्ते, ना स्कूल बस ना विद्यार्थी, सारे काही शांत शांत. अशा वातावरणात शहरवासीयांना गुरुवारची सकाळ अनुभवायला मिळाली. मात्र, साडेआठ-नऊ नंतर वेगवेगळ्या भागांतून निघालेल्या दुचाकी रॅली; रावेत, किवळे, पिंपळे गुरव, हिंजवडीत झालेल्या सभा आणि भोसरी व पिंपरीत दिवसभर झालेले ठिय्या आंदोलन यामुळे मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेला ‘बंद’ शंभर टक्के यशस्वी झाला.

पिंपरी - बंद असलेली दुकाने, ओस पडलेले रस्ते, ना स्कूल बस ना विद्यार्थी, सारे काही शांत शांत. अशा वातावरणात शहरवासीयांना गुरुवारची सकाळ अनुभवायला मिळाली. मात्र, साडेआठ-नऊ नंतर वेगवेगळ्या भागांतून निघालेल्या दुचाकी रॅली; रावेत, किवळे, पिंपळे गुरव, हिंजवडीत झालेल्या सभा आणि भोसरी व पिंपरीत दिवसभर झालेले ठिय्या आंदोलन यामुळे मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेला ‘बंद’ शंभर टक्के यशस्वी झाला.

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (ता. ९) क्रांतिदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्याला शहर परिसरातील व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, सेवाभावी संस्था, शाळा, महाविद्यालयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘आज दूध की गाडी आयी नही’ अशा शब्दांत अनेकांच्या दिवसाची सुरवात झाली. दुकाने उघडलीच नाहीत. बहुतांश शाळा, महाविद्यालयांनी बुधवारीच गुरुवारची सुटी जाहीर केल्याने रस्त्यारस्त्यांवर दिसणाऱ्या स्कूलबस आणि विद्यार्थ्यांची वर्दळही नव्हती.

त्यामुळे सारे वातावरण शांत शांत होते. आठ-साडेआठनंतर वेगवेगळ्या भागांतून तरुणांच्या दुचाकी रॅली निघाल्या. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार सुरू होता. रॅलींमागे पोलिस व्हॅन होत्या. चौकाचौकांत व महत्त्वाच्या रस्त्यांवर ठराविक अंतरावर पोलिस तैनात होते. अनेक ठिकाणी बॅरिकेड उभारलेले होते. भोसरी येथील पीएमटी चौक आणि पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ठिय्या आंदोलने सुरू झाली. दोन्ही ठिकाणी प्रचंड गर्दी होती.

महापौरांचा पाठिंबा
महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, विलास मडिगेरी आदी सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी चौकात ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी आले. मात्र, पवार यांना तरुणांनी बोलू दिले नाही. मारुती भापकर यांनी तरुणांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर जाधव म्हणाले, ‘‘मराठा क्रांती मोर्चाला आमचा पाठिंबा आहे.’’

    पिंपरी चौक व भोसरीतील पीएमपी चौकात दिवसभर ठिय्या आंदोलन
    हिंजवडी, भोसरी, रावेत, चिखली, आकुर्डी, निगडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, वाकड, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी, पिंपरीगाव, खराळवाडी, चिंचवड परिसरात दुचाकी रॅली
    हिंजवडी विप्रो चौकात रास्ता रोको आंदोलन
    शहराच्या विविध भागांतून २७ रॅली पिंपरी चौकात आल्या
    दुचाकी रॅलींमध्ये महिलांचा मोठा सहभाग
    पहिल्या शिप्टमधील आयटी कर्मचारी सकाळी आठपूर्वीच कामावर 
    मोशी उपबाजार, पिंपरी-चिंचवड, भोसरी, आकुर्डीसह शहरातील सर्वच मंडईत ‘बंद’ पाळण्यात आला
    पिंपरी बाजारपेठ पूर्णपणे बंद
    चोविसावाडी, चिखली, कासारवाडी भागात पेट्रोलपंप बंद 
    आळंदी रस्ता, नाशिक महामार्ग, पिंपळे सौदागर भागांत पेट्रोलपंप सुरू
    अत्यावश्‍यक सेवा म्हणून मेडिकल दुकाने सुरू. मात्र, काहींनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला
    महत्त्वाचे चौक, रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त
    पीएमपीची वाहतूक जवळपास ठप्प
    सुटीची सूचना न मिळाल्याने काही विद्यार्थी शाळेत पोचले, मात्र सुटीचा फलक पाहून माघारी फिरले

मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेला ‘बंद’ शहरात शांततेत पार पडला. त्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवलेला होता. ‘बंद’ दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
- मंगेश शिंदे, पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ तीन

फायरब्रिगेडची मदत
खबरदारी म्हणून अग्निशामक दलाने पवना व मुळा नद्यांच्या पुलांजवळ सहा ठिकाणी नदीपात्रात नावाडी व बोटी उभ्या केलेल्या होत्या. पिंपरी चौक, शगून चौक, चापेकर चौक, चिंचवड स्टेशन, रावेत, चिखली-मोशी, भोसरी, निगडी, भोसरी पीएमटी चौक आदी ठिकाणी अग्निशामक दलाचे बंब पोलिसांच्या मदतीसाठी तैनात होते. अग्निशामकच्या जवानांनी डबल ड्यूटी केली. त्यांची साप्ताहिक सुटीही रद्द केलेली होती.

अत्यावश्‍यक सेवांना फटका
पिंपरी - ‘महाराष्ट्र बंद’मुळे शहरात अत्यावश्‍यक सेवांना मोठा फटका बसला. अनेक नागरिकांना दूध मिळाले नाही, तर पीएमपी आणि एसटीच्या सेवाही बंद होत्या. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

चिंचवडगावात सकाळी पहिल्या दोन बस आल्या. नंतर मात्र बससेवा बंद करण्यात आली. बहुतेक ठिकाणी रिक्षा सुरळीत सुरू होत्या. दुपारी चिंचवड स्टेशनला रिक्षा बंद केल्याने गर्दी झाली होती. पिशवीबंद दुधाचा रतीब टाकणारे अनेक व्यावसायिक न आल्याने सामान्यांना मोठा फटका बसला. दुकानेही बंद असल्याने अनेकांना दूध मिळाले नाही. दुसरीकडे सुट्या दुधाची विक्री करणाऱ्यांनी म्हशीचे दूध ६० रुपये प्रतिलिटर अशा दराने विकले. अनेक ठिकाणी गायीचे दूध मिळाले नाही. चिंचवडला काही दुकानदारांकडे ग्राहकांना रांगेत उभे राहून दूध घ्यावे लागले. 

पीएमपीच्या पिंपरी, आकुर्डी, निगडी, चिंचवड यांसारख्या प्रमुख स्थानकांमध्ये शुकशुकाट होता. वल्लभनगर येथील एसटी आगारात बुधवारी (ता. ८) रात्री कोकण, सोलापूर, पंढरपूर, नगर, नाशिक, मुंबई विभागाच्या आलेल्या १४७ बस थांबवून ठेवण्यात आल्या; तसेच या आगारातून अन्य ठिकाणी जाणाऱ्या १३ बस सकाळपासून सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आगारात शुकशुकाट होता. दुपारपर्यंत रेल्वेसेवा सुरळीत सुरू होती; परंतु स्थानकांवर प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती. चिंचवड स्टेशन येथील दवा बाजारातील काही दुकाने सुरू तर काही बंद होती. त्यामुळे आर्थिक उलाढाल मंदावली.

ठळक  वैशिष्ट्ये
 सरकारी बॅंका, टपाल कार्यालयांचे काम सुरळीत
 सहकारी बॅंका बंद
 बहुतांश दुकाने बंद, कर्मचारी दुकानांबाहेर उभे
 रस्त्यांवर तुरळक गर्दी, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची गैरसोय
 ‘कॉट बेसिस’ तत्त्वावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची हाल
 औषधांची काही दुकाने बंद असल्याने रुग्णांना फटका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Martha Kranti Morcha maratha reservation agitation #MaharashtraBandh