#NavDurga भरडधान्यांमधील पोषणमूल्यांच्या खजिन्याचा शोध 

नीला शर्मा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

अन्नपूर्णा कुणाला म्हणावं, तर जी तुम्हाला आहारासंदर्भात जागरूक करू शकेल तिला.  म्हणूनच भरडधान्यांच्या गुणवत्तेबाबत डॉ. अमृता हाजरा या तरुणीने केलेलं संशोधन हे सर्वसामान्यांपासून श्रीमंतासांठीही महत्त्वाचं आहे. 

आकर्षक, चवदार पदार्थांची रेलचेल असणं म्हणजे काही परिपूर्ण जेवण नव्हे. या उलट भरडधान्यं म्हणून दुर्लक्षित ठरलेल्या, स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकणाऱ्या धान्यांची किमया डॉ. अमृता हाजरा पोटतिडकीने लोकांच्या लक्षात आणून देत आहेत. पुण्यातील आयसर या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्थेत त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतात. त्या म्हणाल्या, ‘गेल्या काही वर्षांपासून ‘हेल्थ फूड’ या प्रकाराची लाट आली आहे. बाजारात आरोग्यदायी किंवा आरोग्यवर्धक पदार्थांच्या नावानं विकले जाणारे पदार्थ खरोखरच तसे असतात का? पण याबाबत साक्षरता नसल्यानं लोक त्यावर पैसे खर्च करत असतात.’

अमृता असंही सांगतात की, विकसित देशांमध्येही चमकदार पाकिटांच्या आतले पदार्थ बहुतांशी गहू, तांदूळ, मका व सोयाबीन इत्यादी मर्यादित धान्य प्रकार वापरूनच तयार केलेले असतात. ग्राहक बिनदिक्कत ते घेत आणि रिचवत असतात. विकसित देशांमध्ये जर आहाराबाबत नागरिकांच्या जागरूकतेची ही अवस्था असेल तर मग इतर राष्ट्रांचे काय? भारतात विविध राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर निरनिराळ्या प्रकारची धान्यं असतात, ही माहिती गेल्या दोन - तीन पिढ्यांपासून लोप पावत चाललेली आहे. गहू व भात हे दोनच धान्यप्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. ज्वारी, बाजरी, नाचणी, राळं, वरी यांचं पोषणमूल्य लोकांना लक्षात आणून द्यायला हवंच, असं प्रकर्षानं वाटल्यामुळे ‘मिलेट्‌स’ म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या धान्यांबाबत संशोधन करायचं ठरवलं. 

अमृता यांनी स्पष्ट केलं की, मी अमेरिकेत कॉर्नेल युनिव्हर्सिटीत आधी डॉक्‍टरेट करायला गेले. त्यानंतर पोस्ट डॉक्‍टरेटसाठी न्यूयॉर्कला गेले, तेव्हा मी हा विषय निवडला. निवडक भरडधान्यांची लागवड तीन शेतकऱ्यांकडून प्रायोगिक तत्त्वावर करवून घेतली. या धान्यापासून कोणकोणते रुचकर पदार्थ करता येतील व ते लोकांना कसे भावतील, यासाठी तिथल्या एका रेस्टॉरंटच्या शेफच्या मदतीने प्रयोग केले. परिसरातील लोकांना या संदर्भात माहिती करून देण्यासाठी तंबूतलं प्रदर्शन भरवले. तीन वर्षं चाललेल्या या प्रयोगांमध्ये शेतकरी, विक्रेते, ग्राहक आदींचा वाढत गेलेला सहभाग ही समाधानकारक पावती होती. बंदिस्त प्रयोगशाळेतील प्रयोगांबरोबरच  लोकसहभागाची जोड माझी उमेद वाढवत होती. भारतात परतल्यावर इथल्या सर्वच स्तरांतील नागरिकांमध्ये आता या बाबत साक्षरता वाढवण्याचे प्रयत्न करते आहे. आरोग्य संवर्धनासाठी आपण  भरड समजल्या जाणाऱ्या या धान्यांची पोषणमूल्य  समजून घेतली पाहिजेत. ती प्राप्त करण्यासाठी गहू आणि तांदूळच फक्त न वापरता आलटूनपालटून भरडधान्यांचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NavDurga Dr. Amruta Hajra article