#NavDurga शिकवता शिकवता स्वत: शिकत राहणारी शिक्षिका 

नीला शर्मा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पुण्यातील हुजूरपागा शाळेतील सुधा कांबळे या मराठी विषय शिक्षिका स्वत:ही नवनवे विषय निवडून सतत अभ्यास करीत असतात. उदाहरणार्थ त्यांच्या विद्यार्थिनींना शुद्धलेखन न जमण्यामागे कुठल्या अडचणी कारणीभूत आहेत, पाठ्यपुस्तकांखेरीज मुलींनी शाळेच्या ग्रंथालयातून किती व कुठली पुस्तकं वाचली, दातांच्या कुठल्या तक्रारी मुलींना आहेत वगैरे. सध्या त्या, ‘हुजूरपागा शाळेतील इयत्ता दहावी ‘इ’ तुकडीच्या विद्यार्थिनी कशामुळे मागे पडल्या,’ यावर सर्वांगीण अभ्यास करीत आहेत .

पुण्यातील हुजूरपागा शाळेतील सुधा कांबळे या मराठी विषय शिक्षिका स्वत:ही नवनवे विषय निवडून सतत अभ्यास करीत असतात. उदाहरणार्थ त्यांच्या विद्यार्थिनींना शुद्धलेखन न जमण्यामागे कुठल्या अडचणी कारणीभूत आहेत, पाठ्यपुस्तकांखेरीज मुलींनी शाळेच्या ग्रंथालयातून किती व कुठली पुस्तकं वाचली, दातांच्या कुठल्या तक्रारी मुलींना आहेत वगैरे. सध्या त्या, ‘हुजूरपागा शाळेतील इयत्ता दहावी ‘इ’ तुकडीच्या विद्यार्थिनी कशामुळे मागे पडल्या,’ यावर सर्वांगीण अभ्यास करीत आहेत . मागे पडलेल्या मुली ‘अ’ तुकडीच्या बरोबरीला नाही येऊ शकल्या, तरी त्यांच्या प्रगतीत लक्षणीय सुधारणा निश्‍चित व्हावी, यासाठी त्या परिश्रम घेत आहेत.

सुधाताईंनी सांगितलं, की आमच्या शाळेच्या संपूर्ण इतिहासाचा मी एकदा अभ्यास केला. भारतात मुलींसाठी स्थापन झालेली ही दुसरी शाळा. पहिली कोलकत्यामध्ये होती. इंग्रजांचं वर्चस्व सर्वत्र होतं.  समाजाचा ओढा त्या काळात फक्त मुलांच्या शिक्षणाकडे होता. मुलीला कशाला शिकवायचं, अशी समाजाची मानसिकता. त्यातून बालविवाह, विधवांचं  केशवपन, सती जाणं हे अटळ असायचं. विधवांना जगायची मुभा मिळालीच तर हलाखीचं जीवन वाट्याला यायचं. पंडिता रमाबाई रानडे यांनी या परिस्थितीला टाउन हॉलमध्ये केलेल्या भाषणातून वाचा फोडली. त्यातून मुलींसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. २४ ऑक्‍टोबर १८८४ रोजी शाळा सुरू झाली. प्रथम बुधवार पेठेतील वाळवेकरवाड्यात, मग किबेवाडा आणि नंतर सध्याच्या जागेत शाळा आली. 

सुधाताई म्हणाल्या, की  स्त्रियांना विपरीत स्थितीतून बाहेर काढण्यासाठी किती जणांनी किती परिश्रम घेतले, याचं उदाहरण म्हणून मी हा  इतिहास मुलींमध्ये प्रेरणा जागवण्यासाठी वापरते. ‘या शाळेच्या विद्यार्थिनी म्हणून आपलंही योगदान असायला हवं,’ हे आव्हान मग मी त्यांच्या समोर ठेवते. त्याही झपाटून कामाला लागतात. आमच्या पूर्वीच्या शिक्षिकांनी दिलेला वारसा आम्ही जपतो. आमच्या विद्यार्थिनी शाळेकडून मिळालेला वारसा जपत निरनिराळ्या क्षेत्रांत कामगिरी बजावत आहेत. कित्येक विद्यार्थिनींनी सीमोल्लंघन करून परदेशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. 

विद्यार्थिनींच्या हितासाठी एखादी शिक्षिका स्वतः वेगवेगळ्या सामाजिक विषयांचा अभ्यास कसा सुरू ठेवते, याचं चालतं-बोलतं उदाहरण म्हणजे हुजूरपागा माध्यमिक शाळेतील सुधा कांबळे. या शिक्षिकेचा, अभ्यासातून आनंद घेण्याचा व देण्याचा छंद विद्यार्थिनींमध्येही शिकण्याची कौशल्ये वाढवायला प्रेरित करतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NavDurga sudha kamble story