
आर्थिक साक्षरता हा महिला सक्षमीकरणामधील एक महत्त्वाचा घटक आहे. लग्न झाल्यानंतर नवरा आपली जबाबदारी घेईल किंवा आपल्या उतारवयात मुले आपल्या आधार देतील, हा विचार आता बदलण्याची वेळ आली आहे. महिलांनी सुरवातीपासून स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजे.
-मंजूषा इधाते, विधी अधिकारी, महानगरपालिका.
पुणे - "न्याय, हक्कांसाठी लढण्याबरोबरच स्वतःला सिद्ध करा. महिला ही अबला नसून सबला आहे. त्यामुळे केवळ नऊ दिवस नव्हे, तर आपण सारे मिळून 365 दिवस स्त्रीशक्तीचा जागर करूयात' असा संदेश महिला वकिलांनी पद्मावती देवीची सामूहिक आरती करून दिला.
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पद्मावती येथील पद्मावती देवी मंदिर आणि "सकाळ'च्या माध्यमातून "नारायणी' अर्थात देवीची आरती करण्यात आली. या वेळी शहरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. आश्विन शुद्ध द्वितीयेला अर्थात शारदीय नवरात्रोत्सवाच्या द्वितीय माळेला महिलांसह पुरुषांनीही देवीच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली होती.
"नकूशी नव्हे, तू तर हवीहवीशी' असे म्हणत मुलीच्या जन्माचा सन्मान करूयात. "बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा संदेशही देऊयात. असा संकल्पही महिला वकिलांनी या वेळी केला. त्यांच्या हस्ते पद्मावती देवीची सामूहिक आरती झाली. ऍड. गीतांजली कडते, अनिषा फणसळकर, जयश्री नांगरे, पुष्पा कामठे, नंदा हुंबरे, माधवी परदेशी, वैशाली चांदणे, शारदा वाडेकर, मंजूषा इधाते, राणी कांबळे-सोनावणे, स्नेहा खाणेकर, स्नेहा ढसाळ आदींनी देवीची आरती केली. या प्रसंगी पद्मावती मंदिराचे विश्वस्त गोविंद बिबवे, संजय बिबवे, सचिन बिबवे, अनिल बिबवे, अशोक बिबवे उपस्थित होते. महिला वकिलांचा मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महिला वकिलांच्या प्रतिक्रिया
ऍड. नंदा हुंबरे : स्वबळावर शिक्षण पूर्ण केले. कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता अनेक अडचणींचा सामना करीत मार्ग काढला. तुमचे आयुष्य तुम्हीच घडवू शकता. आनंदाने जीवन जगायचे असेल तर अपेक्षा न ठेवता कष्ट केले तर यश मिळतेच.
ऍड. स्नेहा खाणेकर : मी संयुक्त कुटुंबातून आली आहे. एकुलती एक मुलगी, माझ्या काकांनाही दोन मुली आहे. कुटुंबातून शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे मला आव्हान आहे. मी नक्कीच पूर्ण करेन.
ऍड. राणी राम कांबळे- सोनावणे : मी महिला आहे हीच भावना मनातून काढली पाहिजे. आपण माणूस म्हणून जगले पाहिजे. स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे. समाज हा अनेक कुटुंबाचा होतो. समाज चांगला होण्यास कुटुंबात होणारे संस्कार महत्त्वाचे आहेत. ती जबाबदारी महिलांनी पार पाडावी.
ऍड. शारदा वाडेकर : अन्यायी समाज व्यवस्थेच्या विरोधात तेव्हा आई माझ्या मागे उभी राहिली. तिने शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. आज मागे वळून पाहिले तर आपण ज्या ठिकाणी पोचलो त्याचे आश्चर्य वाटते. कोणी आपल्यावर अन्याय करू नये आणि कोणी दुसऱ्यावर अन्याय करू नये. त्यासाठी लढण्याचा आत्मविश्वास आज निर्माण झाला आहे.
ऍड. माधवी परदेशी : वकील असलेल्या मुलींना लग्नासाठी पसंती दिली जात नाही. ही अत्यंत चुकीची वृत्ती समाजात बळावत आहे. वकील मुलीदेखील सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे कुटुंबाची जबाबदारी सहजपणे पार पाडू शकतात. किंबहुना अधिक चांगल्याप्रकारे ते सर्व कामे करू शकतात. मुलगी वकील असेल, तर तुम्हाला प्रत्येक समस्येतून ती सोडवू शकेल. त्यामुळे मुलगी वकील आहे म्हणून तिला नाकारण्याची वृत्ती बदलली पाहिजे.
ऍड. वैशाली चांदणे : समाजकारण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रासाठी काम करण्याची पहिल्यापासून आवड होती. राजकीय वाटचालीत आलेल्या अडचणीमुळेच वकिली व्यवसाय निवडला. वडील, भाऊ यांच्या पाठिंब्याच्या जोरावर सामाजिक, राजकीय काम करीत आहे, त्याचवेळी वकील व्यवसायातून पीडित महिलांना मोफत न्याय देण्याचे समाधानही मी मिळवीत आहे.
ऍड. गीतांजली कडते : आपण स्वप्ने पाहिली पाहिजे. ती पूर्ण करण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. पुरुष किंवा स्त्री हा भेद न मानता माणूस म्हणून जगले पाहिजे. पुरुषांशी तुलना न करता आपण आपले काम करीत राहून ध्येय गाठू शकतो.
ऍड. स्नेहा रसाळ : माझे आई वडील अशिक्षित; पण आज मी त्यांच्या पाठिंब्यावरच विधी शाखेची पदवीधर झाले आहे. न्यायालयात मला सिनिअर महिला वकिलांकडून चांगले सहकार्य मिळत आहे. मी माझ्याच नाही, तर इतरांच्या अधिकारांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार आहे.
ऍड. पुष्पा कामठे : आजही समाजात आंतरजातीय विवाहाला मान्यता मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. ही विचारणसारणी बदलणे गरजेचे आहे. मला दोन मुले आहेत, एक मुलगी असावी असे वाटत होते. दोन्ही मुले आहेत, त्यांना मी महिलांचा आदर करा हीच शिकवण देत आहे.
ऍड. जयश्री नांगरे : आयुष्यात संघर्ष अटळच आहे, त्यातून व्यक्तीची जडण-घडण होते. समोर येणाऱ्या अडचणी, प्रश्नांवर बुद्धी आणि कौशल्यांचा वापर करून यशाकडे वाटचाल करता येते. आपल्या देशांत बुद्धिवंताची कमी नाही, आपण याच शक्तीचा उपयोग केला, तर सायबर हल्ला करणाऱ्या चीनलादेखील मात देऊ. मी सायबर क्षेत्रातील वकील असल्याने माझ्या आयुष्याचे ध्येयच ते झाले आहे.
ऍड. अनिशा फणसाळकर : समाजातील एक घटक जर तुमच्यासोबत चुकीचे वर्तन करत असेल, तर दुसरा तुम्हाला आधार देण्यासाठी, तुमची मदत करण्यासाठी सरसावतो. मात्र, बाहेरून मदत मिळण्याआधी तुम्ही स्वत:ची मदत करणे महत्त्वाचे असते. स्त्रियांनी मानसिकरीत्या सक्षम होणे आवश्यक आहे.