esakal | आळंदीत २४ तास पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीत २४ तास पाणी

आळंदीत २४ तास पाणी

sakal_logo
By
विलास काटे

आळंदी - आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना विभागवार चोवीस तास शुद्ध पाणी, तसेच आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. निर्मल वारीसाठी प्लॅस्टिक पत्रावळ आणि पिशव्या विक्रीवर बंदी घातली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रदक्षिणा मार्गाचे डांबरीकरण केले आहे. महाद्वाराकडे येणाऱ्या रस्त्यांचे दोन दिवसांत डांबरीकरण करणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १७ जूनला वारीसाठी प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी नगरपालिकेची तयारी सुरू झाली आहे. याबाबत नगराध्यक्षा उमरगेकर यांनी सांगितले, की ‘इंद्रायणीला सध्या मुबलक पाणी आहे. यात्रा काळात पाणी कमी पडू नये, यासाठी वडिवळे किंवा जाधववाडी धरणातून पाणी सोडण्याबाबत पत्रव्यवहार झाला आहे. आवश्‍यकतेनुसार पाणी सोडण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्‍यक यंत्रणा तयार ठेवली आहे. वारी काळात विभागवार चोवीस तास पिण्याचे पाणी सोडले जाणार आहे. देहूफाटा- काळेवाडी परिसरात पिंपरी महापालिकेकडून पाणी देण्यात येणार आहे. शहराबाहेरील किंवा दिंड्यांतील वारकऱ्यांना टॅंकरने पाणी पुरविण्यात येईल. पालिकेच्या मदत केंद्राशी संपर्क साधल्यास टॅंकरने पाणी पुरविले जाईल. सध्या धर्मशाळा तसेच विहिरींमध्ये औषध फवारणी सुरू आहे. दिंड्यांतील वारकऱ्यांना मेडिक्‍लोअरचे वाटप केले जाणार आहे.’

‘निर्मल वारीसाठी पालिकेकडून प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोल पत्रावळींच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे स्वतंत्र पथक अशा पत्रावळी व्यापाऱ्यांकडून जप्त करणार आहे. वारी काळात कचरा तसेच शिल्लक अन्न रस्त्यावर न फेकता पालिकेच्या घंटागाडीतच फेकण्याची सक्ती राहील. पालिकेकडून धर्मशाळा, हॉटेल व्यावसायिकांना मागणीप्रमाणे तत्काळ घंटागाडी पुरविली जाईल. रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे, असेही उमरगेकर यांनी सांगितले.

वारी काळात पाचशेहून अधिक फिरती शौचालये बसविण्यात येणार आहेत. राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून बांधलेल्या सुलभ शौचालयांची दुरुस्ती तसेच स्वच्छतेचे काम सुरू आहे. वारी काळात ही शौचालये मोफत असतील. जिल्हा परिषदेच्या वतीनेही फिरती शौचालये उभारली जाणार आहेत. इंद्रायणीकाठी शहराबाहेर फिरती शौचालये असतील. बंदोबस्तावरील पोलिसांचे जेवण तसेच निवासासाठी पालिका मदत करणार आहे. सर्व शासकीय यंत्रणांच्या संपर्कासाठी मध्यवर्ती कार्यालय तयार केले जाणार असून, मदतीसाठी चोवीस तास कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. दिवाबत्ती दुरुस्ती, गटारांची सफाई आदी कामे सुरू केली आहे. वारी काळात कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार यात्रा काळात भाविकांना सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.