esakal | माउलींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान
sakal

बोलून बातमी शोधा

माउलींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

माउलींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आळंदी - टाळमृदंगाचा टिपेला पोचलेले गजर... माउली नामाचा जयघोष... देहभान विसरून नाचणारे वैष्णव... अशा मंत्रमुग्ध वातावरणात आळंदीकरांनी वीणा मंडपातील पालखी बाहेर आणली अन्‌ उपस्थित हजारो वारकऱ्यांनी पुंडलिका वरदे हरी विठ्ठलचा गजर केला. भक्तिरसात चिंब झालेल्या वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने शनिवारी सायंकाळी पावणेसातला पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. त्यानंतर पावसाला सुरवात झाली. फुगड्या व इतर खेळांमुळे पालखी प्रस्थानास तब्बल पाऊण तास उशीर झाला.

    पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान।
    आणिक दर्शन विठोबाचे।।
    हेचि घडो मज जन्मजन्मांतरी।
    मागणे श्रीहरी नाही दुजे।।

ही भावना उरी ठेवून माउलींच्या सहवासाची आणि विठुराया चरणी सेवा वारी रुजू करण्याची आस बाळगून राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीत आले होते. माउलींच्या पालखीचा
देखणा सोहळा डोळ्यात साठविण्याची प्रत्येकाची इच्छा होती. घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक या नैमित्यिक कार्यक्रमानंतर प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू झाली.
पहाटेपासूनच वैष्णवांचा मेळावा इंद्रायणीकाठी जमला होता. सुमारे सव्वालाख वारकऱ्यांच्या गर्दीने अलंकापुरी दुमदुमली होती. इंद्रायणीकाठी स्नानासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली होती. स्नानानंतर भक्तीसोपान पुलावरील रांगेतून वारकऱ्यांनी माउलींचे दर्शन घेतले. दुपारी दोनपर्यंत दर्शन सुरू होते. दोननंतर समाधीदर्शन बंद करण्यात आले. माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून गळ्यात तुळशीहार आणि गुलाब पुष्पाचा हार घालून तो सजविण्यात आला. माउलींचे हे लोभस रूप डोळ्यात साठवत वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर केला, तर अकरा ब्रह्मवृंदांचा मंत्रघोष सुरू होता.

दुपारी पावणे तीनच्या सुमारास रथापुढील मानाच्या 27 दिंड्या आणि रथामागील 20 दिंड्या महाद्वारातून सोडण्यात आल्या. चोपदार बंधूंच्या मदतीने पोलिस एकेक दिंड्या आत सोडत होते. राजाभाऊ चोपदार मंदिराच्या महाद्वारात ऊर्जितसिंह शितोळे सरकार
यांना आमंत्रण देण्यासाठी सामोरे गेले. माउलींच्या अश्वांनी देऊळवाड्यात पावणे पाचच्या सुमारास प्रवेश केला. गुरू हैबतबाबा यांच्या वतीने मालक बाळासाहेब आरफळकर यांनी मानाची आरती केली. देवस्थानच्या आरतीनंतर मानकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला. या वेळी प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी, सोहळाप्रमुख अभय टिळक उपस्थित होते. त्यानंतर वीणा मंडपातील सजविलेल्या पालखीत डॉ. टिळक यांनी पादुका ठेवल्या. आरफळकर आणि देवस्थानच्या वतीने दिंडीप्रमुख आणि मानकऱ्यांना नारळ प्रसाद, तर संस्थानच्या वतीने दिंडीकरी, फडकरी यांना पागोटे वाटप करण्यात आले. या वेळी बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार महेश लांडगे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

दरम्यान, वीणामंडपातील फुलांनी सजविलेली पालखी पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा घोष करीत आळंदीकरांनी खांद्यावर घेतली. पावणे सातला पालखी मंदिराबाहेर येताच वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. हरिनामाचा गजर टिपेला पोचला. मंदिर प्रदक्षिणा करून महाद्वारमार्गे पालखी नगरप्रदक्षिणेला बाहेर पडली. या वेळी असंख्य वारकऱ्यांनी पालखीचे दर्शन केले. समाज आरतीनंतर पालखी मुक्कामी विसावली.