esakal | वैष्णवांच्या सेवेत रमली पुण्यनगरी 
sakal

बोलून बातमी शोधा

वैष्णवांच्या सेवेत रमली पुण्यनगरी 

वैष्णवांच्या सेवेत रमली पुण्यनगरी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ज्येष्ठ वद्य दशमीचा दिवस... पुण्यनगरीत सर्वत्र ज्ञानोबा, तुकोबाचा जयघोष सुरू होता... वारकरीही विठ्ठल नामात रमले होते... पहाटेच्या काकड्याकरिता मठ-मंदिराकडे भाविकांची पावले वळत होती. संत ज्ञानेश्‍वर आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शनार्थ पालखी विठ्ठल मंदिर; तसेच निवडुंगा विठोबा देवस्थानासमोर भाविकांनी रांगा लावल्या होत्या. वारकऱ्यांची सकाळची न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे भोजन, भजन, कीर्तनासाठी चोख व्यवस्था करीत हजारो सेवेकऱ्यांनी विठ्ठलचरणी सेवा अर्पण केली. 

आषाढीवारीकरिता पंढरीकडे निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासमवेत ज्येष्ठ वद्य नवमीला (ता. 18) पुण्यनगरीत वैष्णवांचा मेळा दाखल झाला. लाखोंच्या संख्येने पुण्यनगरीत दाखल झालेल्या वैष्णवांच्या सेवेकरिता सोमवारी (ता. 19) पहाटेच पुणेकरांची सुरवात झाली. मध्यवर्ती पेठांसह उपनगरांतील मठ-मंदिरे, कार्यालये, धर्मशाळा, महापालिका शाळांमध्ये उत्साही कार्यकर्ते वारकऱ्यांच्या न्याहारीपासून भोजनापर्यंतच्या व्यवस्थेत मग्न होते. वारीतील दिंड्यांची सोयही विविध समाज संघटनांतर्फे करण्यात आली होती. 

भवानी पेठेत पालखी विठ्ठल मंदिर आणि नाना पेठेत निवडुंगा विठोबा देवस्थान येथे पहाटे साडेचार वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पालखी विसाव्याच्या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुण-तरुणीही भाविकांच्या सुरक्षिततेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत होते. ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथा, हरिपाठाचे वाचन, भजन, कीर्तन आणि अभंगात पुणेकरही वैष्णवांसमवेत सहभागी झाले होते. मुक्कामाच्या ठिकाणी एकामागोमाग एक पक्वान्नांच्या भोजनावळी उठत होत्या. तर कसबा गणपती मंदिर, तांबडी जोगेश्‍वरी मंदिर, लालमहाल, शनिवारवाडा, पर्वती, पाताळेश्‍वर लेणी, जंगली महाराज मंदिर, यांसारखी ऐतिहासिक स्थळे; तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पाहण्याचा आनंद वारकऱ्यांनी घेतला. त्यामुळे शहराला जणू पर्यटनस्थळाचे रूप आले होते. सामाजिक, राजकीय संघटनांतर्फे वैष्णवांना मोफत अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. वारीनिमित्त नाना पेठ आणि भवानी पेठेत पथारीवाल्यांनी विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. वारीसोबत जाणाऱ्या परगावच्या विक्रेत्यांनीही पथाऱ्या मांडल्या होत्या. तिन्हीसांजेला वैष्णवांच्या समवेत भजन, कीर्तनात पुणेकरही रमले. विविध संतांचे अभंग, भारुडे गात रात्रीचा जागरही रंगला. शहर व उपनगरांतील विठ्ठल मंदिरांतही भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. पुण्यनगरीतल्या दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्या उद्या (ता. 20) ज्येष्ठ वद्य योगिनी एकादशीच्या मुहूर्तावर पहाटे पंढरीकडे प्रस्थान ठेवतील.