#SaathChal देव भेटेल तुजला आपुल्या घरी...

SaathChal
SaathChal

पुणे - ‘देव भेटेल तुजला आपुल्या घरी, आई-वडिलांच्या पावन चरणावरी...’ चिमुकले वारकरी टाळ-मृदंगाच्या तालात गात होते आणि त्यांच्याप्रमाणेच ‘आई-वडिलांसाठी चार पावलं वारीत चाला’, या ‘सकाळ’च्या आवाहनाला प्रतिसाद देत आलेले असंख्य पुणेकरही हीच भावना जागवत होते. 

आई-वडिलांच्या सेवेत मग्न असल्याने प्रत्यक्ष पांडुरंगाला विटेवर तिष्ठत ठेवणाऱ्या पुंडलिकाचा आदर्श नव्या पिढीपुढे मांडण्यासाठी ‘सकाळ’ने ‘साथ चल’ वारीची आखणी ‘फिनोलेक्‍स केबल्स’च्या मदतीने केली.

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही पुणेकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. 
पूलगेट-भैरोबा मंदिर परिसर असो की हडपसरचे लोहिया उद्यान, आपल्या जन्मदात्यांना आयुष्यभर सांभाळण्याची शपथ पुंडलिकाच्या साक्षीने शालेय मुलांनी आणि तरुणाईने घेतली. 

नेहमी बसची ये-जा, वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न आणि सकाळपासूनच वाहतुकीच्या कोंडीत अडकलेले पुलगेट आज भल्या पहाटेपासून ‘माउलीऽऽ माउलीऽऽऽ’ च्या गजरात दंग झाले होते. अत्तर, गुलाब पुष्पांच्या दरवळणाऱ्या सुगंधाने परिसर प्रसन्न झाला होता. वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, विविध संघटनांचे सदस्य, गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, नगरसेवक, अधिकारी, हास्य-लायन्स-रोटरी आदी क्‍लबचे सदस्य, विविध धर्मांचे प्रतिनिधी, सर्वसामान्य पुणेकर... महात्मा गांधी बसस्थानक हळूहळू या मंडळींनी भरू लागले. मुलेही अभंग गात होती. शीख भाविक प्रभाती जथ्थातून नामदेवांच्या गुरू ग्रंथसाहिबामधील रचना सादर करत होते. हास्य क्‍लबचे सदस्य उत्साहाचे फवारे उडवत होते. मराठी माध्यमासह इंग्लिश माध्यमातील मुलेही उत्कृष्ट अभंग सादर करीत होते. मुलीही ढोल-ताशाचा ताल धरत होत्या. 

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी उपस्थितांना माता-पित्याच्या रक्षणाची शपथ दिली आणि त्यानंतर दिंडी पालखी सोहळ्यात सहभागी झाली. या वेळी ‘साथ चल’ उपक्रमाचे सहप्रायोजक राजवर्धन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक विवेक बिडगर आणि त्यांचे वडील सीताराम हेही उपस्थित होते. तेथून ही दिंडी भैरोबा नाला येथील शिवरकर शाळेच्या मैदानावर आली. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांना महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी शपथ दिली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांबरोबर आळंदी ते पंढरी या प्रवासात वारकऱ्यांबरोबर शहराच्या वेगवेगळ्या भागातील, विविध धर्म-पंथ-जातीचे, भिन्न-भिन्न क्षेत्रातील लोक ‘साथ चल’मध्ये एकत्र चालत असल्याचे दृष्य दिसत होते. 

‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही ‘साथ चल’ या उपक्रमामागची मुख्य संकल्पना. याच संकल्पनेवर आधारित ‘साथ चल’ दिंडीची सुरवात तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या देहूमधून मंगळवारी झाली. 

आई-वडिलांच्या सेवेत लीन झालेल्या पुंडलिकाला भेटण्यासाठी आलेला पांडुरंग २८ युगांपासून विटेवर उभा आहे. त्याच्या सेवेचा हा महिमा ओळखून आपणही आपल्या जन्मदात्यांसाठी या वारीमध्ये काही अंतर चालावे, हा यामागचे उद्देश होता. ‘विठुमाउली, ज्ञानोबा-तुकोबा माउली म्हणत असताना घरच्या माऊलीकडेही लक्ष द्यावे, वृद्धाश्रमांची संख्या वाढू नये,’ असाच संदेश त्यातून दिला जात होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com