#SaathChal संस्कारांची पेरणी : ‘साथ चल’

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 June 2019

...अशी आहे शपथ
आषाढी वारीनिमित्त पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघालेल्या संतांच्या साक्षीने शपथ घेतो, की माझे घर माझे मंदिर आहे. त्या मंदिरातील दैवत माझे आई-वडील आहेत. त्यांची सेवा हीच ईश्‍वर सेवा आहे, असे मानून मी त्यांची जन्मभर सेवा करेन. त्यांचे सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य हे माझे प्राधान्य असेल, अशी मी ग्वाही देतो. भक्त पुंडलिकाप्रमाणे माझे वर्तन राहील, अशी सुबुद्धी मला मिळो, अशी मी विठ्ठल चरणी, संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या चरणी प्रार्थना करीत आहे.

पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची वाटचाल म्हणजे संस्कारांची पेरणीच... 

‘साथ चल,’ ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी सुरू केलेला उपक्रम. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही मूळ संकल्पना. पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम. आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदी येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात राबविण्यात येणारा. त्याला देहूतील संत तुकाराम महाराज संस्थान आणि आळंदीतील संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान यांचे सहकार्य लाभलेले.

शहरातील शाळा, महाविद्यालये, डॉक्‍टर, वकील, साहित्यिक, कामगार, संस्था, संघटना, मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होत आहेत. आई-वडिलांच्या सेवेची शपथ घेत आहेत. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी सुरू केलेल्या या उपक्रमाने द्वितीय वर्षात पदार्पण केले आहे.

यंदाची वाटचाल मंगळवारी (ता. २५) निगडीतील भक्ती-शक्ती चौकापासून सुरू झाली. देहू संस्थानचे अध्यक्ष, सोहळाप्रमुख व विश्‍वस्तांच्या हस्ते भगवी पताका फडकावून उपक्रमाचे औपचारिक उद्‌घाटन झाले. बुधवारची (ता. २६) वाटचाल पहाटे पाच वाजता आकुर्डीतील विठ्ठल मंदिरापासून सुरू झाली. देहूतील पंचम वेद वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसह अनेक संस्था, संघटना व शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले. 

पहाटेचा गार वारा अंगावर झेलत टाळ-मृदंगाच्या गजरात सोहळा पुढे सरकत होता. ज्ञानोबा- तुकारामाचा जयघोष सुरू होता. ठिकठिकाणी थांबून भाविक पालखी रथाचे दर्शन घेत होते. सकाळी सातच्या सुमारास सोहळ्यातील चौघडा रथ मोरवाडीतील फिनोलेक्‍स केबल्स कंपनीसमोरून पुण्याकडे मार्गस्थ झाला. सव्वासातच्या सुमारास पालखी रथ आला. तत्पूर्वी फिनोलेक्‍सचे कार्यकारी अधिकारी दीपक छाब्रिया यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांसमवेत ‘आई-वडिलांच्या सेवेची’ शपथ घेतली. ‘आषाढी वारीनिमित्त पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघालेल्या संतांच्या साक्षीने शपथ घेतो की, माझे घर माझे मंदिर आहे. त्या मंदिरातील दैवत माझे आई-वडील आहेत. त्यांची सेवा हीच ईश्‍वरसेवा आहे, असे मानून मी त्यांची जन्मभर सेवा करेन. त्यांचे सुख, समाधान व उत्तम आरोग्य हे माझे प्राधान्य असेल, अशी मी ग्वाही देतो. भक्त पुंडलिकाप्रमाणे माझे वर्तन राहील, अशी सुबुद्धी मला मिळो, अशी मी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो.’ शपथ घेतल्यानंतर फिनोलेक्‍सचे कार्यकारी अध्यक्ष दीपक छाब्रिया यांनी कुटुंबीयांसह पादुकांचे दर्शन घेतले.

‘साथ चल’ उपक्रम गेल्या वर्षी सुरू केला. आपण आपल्या आई-वडिलांची देवाप्रमाणे काळजी घेतली पाहिजे. कारण, त्यांनीच आपल्याला लहानाचे मोठे केलेले असते. गेल्या वर्षीपासून या उपक्रमात सहभागी होऊन अनेक जण आई-वडिलांची सेवा करण्याची शपथ घेत आहेत, याचा आनंद आहे. उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक आहे. कारण, या उपक्रमामुळे मुले व त्यांचे आई-वडील यांच्यातील नातेसंबंध मजबूत होतील, असा विश्‍वास वाटतो.
- दीपक छाब्रिया, कार्यकारी अध्यक्ष, फिनोलेक्‍स केबल्स

पिंपरीकरांचा उत्स्फूर्त सहभाग 
‘सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्स’च्या ‘साथ चल’ दिंडीला पिंपरी-चिंचवड शहरातून उदंड प्रतिसाद मिळाला. 

‘साथ चल’ दिंडीत सहभागी झालेल्यांमध्ये फिनोलेक्‍स केबल्सचे कार्यकारी अध्यक्ष दीपक छाब्रिया, यांच्यासह कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, देहूतील वेद पंचम वारकरी शिक्षण संस्था, ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, मॉडर्न हायस्कूल यमुनानगर, ज्ञानदीप विद्यालय रुपीनगर, सरस्वती विद्यालय, म्हाळसाकांत विद्यालय, कीर्ती विद्यालय, जगा व जगू द्या फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड सीएस संघटना, चिंचवड पोलिस ठाणे शांतता समिती, सीए संघटना, महाराष्ट्र साहित्य परिषद, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, समरसता साहित्य परिषद, शब्दधन काव्यमंच, दिलासा संस्था, नागरी हक्क सुरक्षा व जागृती समिती, पुणे डिस्ट्रिक्‍ट योगा ॲण्ड फिटनेस इन्स्टिट्यूट, एचए मुष्टियुद्ध क्‍लब, फॅमिली फिजिशियन असोसिएशन, क्वीन्स टाऊन हाउसिंग सोसायटी सहभागी झाली होती. लायन्स क्‍लब ऑफ रहाटणी यांनी पाणी व बिस्किटांची व्यवस्था केली होती.

आमचाही सहभाग...
  आयटीआय मोरवाडी महापालिका
  मनोरम विद्यालय, चिंचवड
  चाटे क्‍लासेस, चिंचवड
  समर्थ विद्यालय, चिंचवड
  अग्रसेन ट्रस्ट, चिंचवड
  शिवजिजाऊ महिला प्रतिष्ठान, जुनी सांगवी
  विश्‍व सिंधी सेवा संगम, पिंपरी
  प्रगती जैन महिला मंडळ, संत तुकारामनगर
  अर्जुन ठाकरे व मित्र परिवार
  ज्येष्ठ नागरिक संघ, मासुळकर कॉलनी
  मराठवाडा मित्र महाविद्यालय, थेरगाव
  अंजू सोनवणे व पोलिस मित्र परिवार
  योगा ग्रुप, मासूळकर कॉलनी
  मानवी हक्क संरक्षण आणि जागरण 
  प्रयास यूथ फाउंडेशन, निगडी
  नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन 
  इंडियन मेडिकल असोसिएशन 
  आपुलकी ज्येष्ठा नागरिक संघ, आकुर्डी
  नगरसेविका अनुराधा गोरखे
  नगरसेवक समीर मासूळकर
  माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे
  साईनाथ ट्रस्ट, पिंपरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saath Chal Wari 2019 Aashadhi Wari Palkhi Sohala Sakal