#SaathChal देहूकरांचा पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 July 2018

देहू - टाळ-मृदंग आणि तुकाराम तुकाराम नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (ता. ६) सकाळी अकरा वाजता देहूतील इनामदारवाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे आगमन होताच ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली. या वेळी हरिनामाचा गजर केला. 

देहू - टाळ-मृदंग आणि तुकाराम तुकाराम नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (ता. ६) सकाळी अकरा वाजता देहूतील इनामदारवाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे आगमन होताच ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली. या वेळी हरिनामाचा गजर केला. 

सोहळ्याचा पहिला मुक्काम इनामदारवाड्यात होता. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता परंपरेनुसार इनामदारवाड्यात शासकीय पूजा झाली. विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आणि पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी सपत्निक संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची महापूजा केली. त्यानंतर आरती झाली. या वेळी पालखी सोहळा प्रमुख सुनील दा. मोरे, अशोक मोरे, विठ्ठल मोरे, संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्‍वस्त अभिजित मोरे, सुनील दि. मोरे, दिलीप इनामदार गोसावी, सरपंच उषा चव्हाण, पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार गीतांजली शिर्के, गटविकास अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर, बाळासाहेब मखरे, सदस्या हेमा मोरे, रत्नमाला करंडे, उपसरपंच राणी मुसुडगे उपस्थित होते. त्यानंतर सकाळी अकरा वाजता इनामदारवाड्यातून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. देहूतील बाजारपेठेत महिलांनी दुतर्फा दर्शनासाठी गर्दी केली होती. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वारीतील दिंडी प्रमुखांना औषधांचे किट वाटले.

दुपारी बारा वाजता अनगडशावलीबाबा दर्ग्याजवळ पालखीचे आगमन झाले. परंपरेनुसार येथे आरती झाली. माळवाडी येथील परंडवाल आणि बिरदवडे कुटुंबीयांकडून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात पालखी ठेवण्यात आली. कुरुळी येथील कड आणि माण येथील शेळके कुटुंबीयांची बैलजोडी रथास जुंपण्यास आली. पालखी रथाचे माळवाडी, झेंडेमळा, चिंचोली येथे आगमन होताच ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली. रथाच्या पुढे २५ दिंड्या आणि रथामागे २६५ दिंड्या सहभागी झाल्या आहेत; तसेच मानाच्या अश्‍वांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.

पालखी मार्गावर शिरीषकुमार मित्र मंडळाने भाविकांना अन्नदान केले. तसेच, रोटरी क्‍लब देहूच्या वतीने वारकऱ्यांना घोंगडयांचे वाटप करण्यात आले. माळवाडी येथे जीवनरेखा रुग्णालय आणि रोटरी क्‍लब देहूरोडच्या वतीने औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal देहूकरांचा पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप