#saathchal पंढरीची वारी, आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थव्रत

बाबा महाराज सातारकर
Saturday, 7 July 2018

आम्हा सातारकरांकडे वारकरी संप्रदायाच्या सेवेची सव्वाशे वर्षांची परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. आमच्या कुटुंबात प्रत्येकाने आपली वारी करण्याची परंपरा आहे. ती परंपरा दादा महाराज, अप्पा महाराजांनी घालून दिली आहे. मी आजोबा आणि आई-वडिलांसोबत वारी करायचो. मला आठवते तेव्हापासून मी वारीत आहे. लहान असल्याने कोणाच्या खांद्यावर बसून का होईना... वडील मृदंग वाजविताना मला त्यांच्या मृदंगावर बसवायचे. लहानपणापासून सुरू असलेली ही अखंड पंढरीची वारी आता वयाच्या ८३ व्या वर्षांपर्यंत सुरू आहे. मी दादा महाराजांचा लाडका होतो. लहानपणापासून मी त्यांच्या पुढे बसून कीर्तन ऐकायचो.

आम्हा सातारकरांकडे वारकरी संप्रदायाच्या सेवेची सव्वाशे वर्षांची परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. आमच्या कुटुंबात प्रत्येकाने आपली वारी करण्याची परंपरा आहे. ती परंपरा दादा महाराज, अप्पा महाराजांनी घालून दिली आहे. मी आजोबा आणि आई-वडिलांसोबत वारी करायचो. मला आठवते तेव्हापासून मी वारीत आहे. लहान असल्याने कोणाच्या खांद्यावर बसून का होईना... वडील मृदंग वाजविताना मला त्यांच्या मृदंगावर बसवायचे. लहानपणापासून सुरू असलेली ही अखंड पंढरीची वारी आता वयाच्या ८३ व्या वर्षांपर्यंत सुरू आहे. मी दादा महाराजांचा लाडका होतो. लहानपणापासून मी त्यांच्या पुढे बसून कीर्तन ऐकायचो. त्या वेळी काही कळायचे नाही; पण तेव्हा जे काही कानावर पडले, ते संस्काराने आतपर्यंत भिडले. वयाच्या 

चौथ्या वर्षी मी दादा महाराजांच्या कीर्तनात चाल म्हटली. त्यांच्या संस्कारांतच मी घडलो. १९४६ मध्ये दादा महाराजांनी पायाला जखम असतानाही चिखलात उभे राहून कीर्तन केले होते, ही वारीवरील निष्ठा मी बघितली आहे. ती निष्ठा पुढे आमच्या पिढीत आली. 

सांगायला अभिमान वाटतो, आतापर्यंत आमच्या घरची कोणाचीही आषाढी-कार्तिकीची वारी कधी चुकली नाही. आजोबा दादा महाराज, वडील भाऊ महाराज त्यानंतर मी. माझ्या पुढची मुलगी भगवतीताई, नातू चिन्मय महाराज अशी समर्थ पिढी वारकरी संप्रदायाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य करीत आहे. लहान असलेल्या माझ्या पणतीलाही वारीत अधूनमधून आणतो. त्यामुळे मी नेहमी म्हणतो, माझे वय ८३ आणि माझी यंदाची वारी ८४ वी, त्याचे कारण म्हणजे माझी एक वारी आईच्या पोटात झाली आहे. अर्थात त्या माउलीनेच आमच्याकडून सर्व करवून घेतले आहेत. आता शरीर साथ देत नाही; पण वारीची ओढ कमी होत नाही. पाच पावले का होईना या मार्गावर चालतो आणि गाडीतून या मार्गावर राहतो. कितीही आजारी असलो तरी वारीत राहायचे, कीर्तन करायचे, अखंड नामघोष ऐकायचा ही निष्ठा आहे. अनेक अडचणींवर मात करण्याची ताकद माउली देते. त्यामुळे आम्ही एकच म्हणतो, पंढरीची वारी, आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थव्रत. 

सध्याच्या काळात नात्यातील दुरावा वाढत चालला आहे. एकत्र कुटुंब पद्धती मागे पडत चालली आहे. मुलांना नऊ महिने पोटात वाढवायचे, लहानपणी त्यांचे संगोपन करायचे, शिकवायचे, त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे. इतके सर्व करून जीवनाच्या उत्तरार्धात त्याच जन्मदात्यांना सांभाळण्याचा प्रश्‍नच कसा उद्‌भवू शकतो. दोन वेळ अन्न खायला कोणी विसरते का; मग जन्मदात्यांना मुले कशी विसरतात. त्या जन्मदात्यांचा सांभाळ करणे हे कर्तव्यच आहे. घरात मतभेद असू शकतात. मात्र, मनभेद कधीच होता कामा नये. जीवनाचा सर्व डोलारा संस्कारांवर आधारलेला असतो. संस्काराची नाळच नात्यातील जिव्हाळा टिकवीत असते. नात्यांमध्ये आपुलकी निर्माण होत नाही, तोपर्यंत समाजातील वृद्धाश्रम बंद होणार नाहीत. 

(शब्दांकन - शंकर टेमघरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #saathchal baba maharaj satarkar interview