#SaathChal उद्योगनगरीत भाविकांनी घेतली शपथ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 July 2018

पिंपरी - आषाढी वारीनिमित्त देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्यांच्या साक्षीने पिंपरी-चिंचवडमधील सात ठिकाणी भाविकांनी आई-वडिलांची सेवा करण्याची शपथ घेतली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’ यांच्यातर्फे आयोजित ‘साथ चल’ दिंडीचे. 

पिंपरी - आषाढी वारीनिमित्त देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्यांच्या साक्षीने पिंपरी-चिंचवडमधील सात ठिकाणी भाविकांनी आई-वडिलांची सेवा करण्याची शपथ घेतली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’ यांच्यातर्फे आयोजित ‘साथ चल’ दिंडीचे. 

‘वारी विठुरायाची अन्‌ आई-वडिलांच्या सेवेची’ या संकल्पनेतून ‘साथ चल’ दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान आणि आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान यांचे सहकार्य दिंडीला लाभले आहे. संत तुकोबारायांचा पालखी रथ निगडीतील भक्ती-शक्ती चौकात शुक्रवारी आला. त्या वेळी देहू संस्थानचे पदाधिकारी आणि पिंपरी-चिंचवडमधील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘साथ चल’ दिंडीचा प्रारंभ झाला. त्यामध्ये देहू येथील पंचमवेद वारकरी शिक्षण संस्थेच्या बालवारकऱ्यांसह शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, कामगार, साहित्यिक सहभागी झाले होते. दिंडीचा पहिला टप्पा आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराजवळ पालखी मुक्कामाला पोचल्यानंतर संपला. त्या वेळी देहू संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित भाविकांना आई-वडिलांच्या सेवेची शपथ दिली. 

पावसात भिजत वाटचाल
‘साथ चल’ दिंडीची शनिवारची वाटचाल आकुर्डी गावातील विठ्ठल मंदिरापासून पहाटे पाच वाजता सुरू झाली. त्या वेळी पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पावसात भिजत अनेक भाविक दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीच्या आजच्या वाटचालीचा समारोप फुगेवाडी येथे झाला. आकुर्डी ते फुगेवाडी या दरम्यान दिंडीचे सहा टप्पे झाले. आकुर्डी येथील खंडोबा माळ, चिंचवड स्टेशन, फिनोलेक्‍स केबल्स (मोरवाडी चौक), एचए कॉलनी, नाशिक फाटा आणि फुगेवाडी आदी ठिकाणी भाविकांनी आई-वडिलांच्या सेवेची शपथ घेतली. कधी पावसाच्या सरी, तर कधी थंडगार वाऱ्याची झुळूक साथीला ‘ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ’चा गजर अशा वातावरणात शनिवारची वाटचाल झाली. या दरम्यान, फिनोलेक्‍स केबल्सचे कार्यकारी अध्यक्ष दीपक छाब्रिया, अध्यक्ष (विपणन) श्रीधर रेड्डी, सहायक उपाध्यक्ष (मनुष्यबळ विकास विभाग) जितेंद्र मोरे, अध्यक्ष (ओएफएस) सुनील उपमन्यू, पी. एम. देशपांडे (प्रकल्प प्रमुख- उर्से), रमेश ललवानी (अध्यक्ष, वित्त आणि लेखा विभाग) आदी सहभागी झाले होते.   

उद्या पुलगेट ते हडपसर
संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळे शनिवारी पुण्यात पोचले. सोमवारी (ता. ९) दोन्ही सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. त्या वेळी ‘साथ चल’ दिंडी पुण्यातील पुलगेट बसस्थानकापासून निघणार आहे. पहिला टप्पा भैरोबा मंदिरापर्यंत असेल. दुसरा टप्पा भैरोबा मंदिरापासून लोहिया उद्यानापर्यंत असेल. तिसरा टप्पा लोहिया उद्यान ते हडपसर गाडीतळ असा असेल. यापैकी कुठल्याही टप्प्यात पुणेकर भाविकांना सहभागी होता येणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal Devotees took the oath in pcmc