esakal | #SaathChal तुकाराम महाराजांच्‍या पादुकांना नीरास्नान
sakal

बोलून बातमी शोधा

नीरा (ता. इंदापूर) - नीरास्नान आटोपल्यानंतर डोक्‍यावर पादुका घेऊन जाताना सोहळाप्रमुख.

#SaathChal तुकाराम महाराजांच्‍या पादुकांना नीरास्नान

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नीरा नरसिंहपूर - जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरेच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. पुणे जिल्ह्यातील सराटीचा शेवटचा मुक्काम संपल्यानंतर पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजला लाखो वैष्णवांच्या साक्षीने मार्गस्थ झाली. पुणे जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाने पालखी सोहळ्यास निरोप दिला.

सराटी मुक्कामी पहाटे चार वाजता काकडा आरती करण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने पादुकांच्या चार पूजा संपन्न झाल्या. सकाळी सात वाजता देहू संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे, पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे, विश्वस्त अशोक मोरे, विठ्ठल मोरे, अभिजित मोरे, बापूसाहेब मोरे यांनी परंपरेप्रमाणे पादुकांना नीरा नदीत स्नान घातले. त्यानंतर महापूजा व आरती करण्यात आली. भक्तांच्या व वारकऱ्यांच्या दर्शनासाठी पादुका सराटी येथील जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले होते.

या वेळी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप बोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, प्रांताधिकारी हेमंत निकम, अतिरिक्त पोलिस अधिक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार श्रीकांत पाटील, अजय बेंद्रे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, पोलिस निरीक्षक मधुकर पवार, जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे, सरपंच रमेश कोकाटे आदींनी दर्शन घेऊन पादुकांना पुणे जिल्ह्यातून सन्मानपूर्वक निरोप दिला.

पालखी सोहळा सकाळी आठ वाजता पुणे जिल्ह्यातून नीरा नदीवरील पुलावरून लाखो वैष्णावांच्या व भक्तांच्या साथीने ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकारामच्या जयघोषात सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे मार्गस्थ झाला. सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर पालकमंत्री विजय देशमुख, आमदार हनुमंत डोळस, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक विरेश प्रभू, मदनसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, सभापती वैष्णवदेवी मोहिते पाटील, अँड. हासिना शेख आदींनी तोफांच्या सलामीने स्वागत केले.