#SaathChal मेंढ्यांच्या प्रदक्षिणेने भारावला पालखी सोहळा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 July 2018

डोर्लेवाडी - विठ्ठल नामाचा जयघोष करीत पंढरपूरकडे निघालेल्या संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे पिंपळी (ता. बारामती) येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पावसाच्या हजेरीत मेंढ्यांचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

डोर्लेवाडी - विठ्ठल नामाचा जयघोष करीत पंढरपूरकडे निघालेल्या संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे पिंपळी (ता. बारामती) येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पावसाच्या हजेरीत मेंढ्यांचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

सोमवारी (ता. १६) बारामतीचा मुक्काम आटोपून सकाळी पालखी सोहळा गावात दाखल होताच फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. येथील मेंढपाळ शेतकरी अनंता केसकर, अर्जुन केसकर, गणपत केसकर, ज्ञानदेव केसकर, अंकुश केसकर यांनी प्रथेप्रमाणे आपल्या मेंढ्या स्वागतासाठी आणल्या होत्या. टाळ-मृदंगाचा नाद व पुंडलिक वरदाचा गजर होताच हजारो भाविकांच्या गर्दीत मेंढ्यांनी पाच प्रदक्षिणा घालून रिंगण सादर केले. त्यानंतर छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष ढवाण, सरपंच राजेंद्र केसकर, खरेदी विक्री संघाचे संचालक भाऊसाहेब भिसे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश देवकाते, मोहन बनकर, ग्रामविकास अधिकारी संजय गावडे, नितीन देवकाते, सुनील बनसोडे व इतर पदाधिकाऱ्यांनी बैल जोडी व अश्‍वाची पूजा करून पालखी सोहळा प्रमुखांचे स्वागत केले. त्यानंतर पालखी हनुमान मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. याठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी कढी-भात व पिटल-भाकरी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. हनुमंत तांबे यांच्या वतीने दूध वाटप करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा काटेवाडीकडे मार्गस्थ झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal palkhi wari sheep round sopankaka maharaj palkhi sohala