#SaathChal पुणेकरांनो, आज हे रस्ते बंद आहेत! 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 July 2018

पुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी आज (रविवार) पुणे शहरात आहेत. त्याशिवाय, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त शहरात आहेत. त्यामुळे रविवारी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वाहतूक संथ गतीने होण्याची शक्‍यता आहे. 

पुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी आज (रविवार) पुणे शहरात आहेत. त्याशिवाय, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त शहरात आहेत. त्यामुळे रविवारी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वाहतूक संथ गतीने होण्याची शक्‍यता आहे. 

पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत झालेले बदल 
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्यांचे काल (शनिवार) शहरात आगमन झाले. या पार्श्‍वभूमीवर शहर वाहतूक शाखेने वाहतुकीमध्ये बदल केले. पालखी दरम्यान काही रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे, त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

पालखी मार्गावरील बंद रस्ते : 
* संत तुकाराम महाराज पालखी 
पुणे ते नाशिक फाटा, चर्च चौक, शितळादेवी, बोपोडी, आंबेडकर चौक ते दापोडी, औंध रस्ता, रेंजहिल्स, पोल्ट्री चौकाकडे येणारी वाहतूक, खडकी बाजार ते बोपोडी चौक, मुळा रस्ता ते बजाज उद्यान चौक, खडकी ते बोपोडी चौक, आरटीओ ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक, सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक. 

* संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी 
दिघी मॅगझीन ते आळंदी, वडमुखवाडी ते आळंदी रस्ता, पांजरपोळ चौक, बनाचा ओढा, भोसरी ते महादेव मंदिर दिघी, कळस फाटा ते आळंदी/विश्रांतवाडी चौक, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर ते आळंदी रोड जंक्‍शन, सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट रोड बंद, चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता, नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक बंद, होळकर पूल ते चंद्रमा चौक, साप्रस चौक 

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी एकत्र मार्ग 
* रेंजहिल्स चौक ते संचेती चौक (गणेश खिंड रस्ता) 
* खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (फग्युर्सन रस्ता) 
* तुकाराम पादुका चौक ते बेलबाग चौक 
* टिळक रस्ता - पूरम चौक ते टिळक चौक (अलका टॉकीज) 
* लक्ष्मी रस्ता - बेलबाग चौक ते टिळक चौक 
* शिवाजी रस्ता - जिजामाता चौक ते बुधवार चौक, बेलबाग चौक 
* लक्ष्मी रस्ता- संत कबीर चौक, बेलबाग चौक 
* बेलबाग चौक ते श्री निवडुंग्या विठोबा मंदिर/ पालखी विठोबा मंदिर 

अमित शहा घेणार पालखीचे दर्शन 
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या व्याख्यानासाठी अमित शहा आज पुण्यात आहेत. दुपारी बारा वाजता शहा पुण्यात येतील. त्यानंतर लगेचच शहा दोन्ही पालख्यांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर प्रदेश भाजपाच्यावतीने आयोजित सोशल मीडियाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबाधिनीने आयोजित केलेले राभमाऊ म्हाळजी स्मृती व्याख्यान गणेश कला क्रीडा केंद्रात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील दीड हजार मान्यवरांना उपस्थित करण्यात आले असून एकूण पाच हजार लोकांची व्यवस्था करण्यात आल्याचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. सभागृहात दोन हजार सातशे लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून पाऊस व्यत्यय आला नाही तर सभागृहाचे बेसमेंट व पार्किंगच्या जागेत सुमारे आणखी तीन ते साडेतीन हजार लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

या कार्यक्रमामुळे स्वारगेट परिसरातही सायंकाळी मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्याख्यानाच्या कार्यक्रमाशिवाय अमित शहा बूथ प्रमुख व केंद्र प्रमुखांच्या बैठकीला ते मार्गदर्शन करणार आहेत. या शिवाय शहरातील काही प्रमुख व्यक्तींच्या भेटीचा कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून विधानसभानिहाय तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal roads are closed today for wari