esakal | #saathchal माउलींच्या जयघोषाने दुमदुमली अलंकापुरी
sakal

बोलून बातमी शोधा

#saathchal माउलींच्या जयघोषाने दुमदुमली अलंकापुरी

#saathchal माउलींच्या जयघोषाने दुमदुमली अलंकापुरी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आळंदी -
पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा।
शेषा सहस्त्र मुखा न वर्ण वेची।।
पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी।
जन्मोजन्मी वारी घडली तया।।

ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णव चार दिवसांपासून आळंदीत दाखल झाले. इंद्रायणीचा दोन्ही तीर आणि अवघी अलंकापुरी टाळमृदंगाचा गजर आणि माउली नामाच्या अखंड जयघोषाने आज दुमदुमून गेली.

माउलींच्या प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून अनेक छोट्या-मोठ्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. रथापुढे सत्तावीस दिंड्या, रथामागे दोनशे एक आणि तात्पुरते नंबर दिलेल्या सुमारे तीनशेहून अधिक दिंड्या वारीत सहभागी होण्यासाठी आळंदीत गेल्या चार दिवसांपासून आल्या आहेत. याशिवाय पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दोन लाख वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. 

दोन दिवस पाऊस पडल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह होता. आज सकाळपासून वातावरण ढगाळ होते. मात्र, दहानंतर पुन्हा ऊन-सावल्यांचा खेळ सुरू झाला. पावसाने उघडीप दिल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह होता. शहरात ठिकठिकाणी राहुट्या आणि धर्मशाळांमधून टाळमृदंगाचा घोष अन्‌ हरिनामाचा गजर, ज्ञानेश्वरी पारायण सुरू होते.

दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीत स्नानासाठी आज पहाटेपासून वारकऱ्यांनी गर्दी केली होती. पाणीपातळी वाढत असल्याने इंद्रायणीच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत होते. मात्र, वैष्णवांच्या या अलोट गर्दीने संपूर्ण इंद्रायणी परिसर गजबजला होता. इंद्रायणी तीरावर विविध दिंड्या भजन, भारूड अन्‌ माउलींचा जयघोष करत होत्या. वासुदेवांची हाळी सुरू होती. 

भक्तिरसात तल्लीन झालेल्या महिला पुरुष वारकरी आनंदाने फुगड्या खेळत होते. वारकऱ्यांचे खेळ मोबाईल, कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेकांची लगबग सुरू होती. अनेकजण वारकऱ्यांबरोबर सेल्फी काढत होते. मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा रस्त्यावर, देहूफाटा येथे दुकानांची गर्दी होती. 

पहाटेपासून माउलींच्या मंदिरात समाधी दर्शनासाठी गर्दी होती. दुपारी बारानंतर मात्र वारकऱ्यांना वेध लागले, ते मुख्य प्रस्थान सोहळ्याचे. माउलींच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेड्‌स लावून फक्त दिंड्यांनाच सोडण्याचे नियोजन केले होते. प्रस्थान काळात माउलींच्या मंदिराकडे इतरांना जाण्यास बंदी होती. मानाच्या दिंड्यांना भराव रस्त्यावरून दोनच्या सुमारास मंदिरात प्रवेश देण्यात आला. या वेळी प्रदक्षिणा रस्त्यावरही वारकऱ्यांची गर्दी होती. त्यानंतर प्रस्थानाचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला.

‘माझे कपडे अन्‌ मोबाईल द्या’ 
इंद्रायणीच्या पाणीपातळी वाढ झाल्याने गुरुवारी रात्री भक्ती सोपान पुलावरील दर्शनबारी बंद करण्यात आली होती. या वेळी एक वारकऱ्याला पोलिस पाण्यात उतरू नको; म्हणून प्रतिबंध करत होते. तरीही तो न जुमानता पाण्यात उतरला आणि वाहून गेला. सुमारे तीन ते साडेतीन तासांनंतर तो पुन्हा स्वतःहून बाहेर आला आणि सकाळी पोलिस चौकीत हजर झाला. या वेळी त्याने पोलिसांकडे कपडे आणि मोबाईलची मागणी केली. पोलिसांनी या वारकऱ्यास त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, आवाहन करूनही अनेक वारकरी जीव धोक्‍यात घालून नदीपात्रात उतरत होते.