#SaathChal वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 July 2018

पुणे - सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन्‌ मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून निघालेल्या वैष्णवांचा मेळा शनिवारी रात्री पुण्यनगरीत विसावला. भागवत धर्माची पताका हाती घेतलेल्या वारकऱ्यांच्या संगे संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे आगमन होताच भक्तिमय वातावरणात झाले. 

पुणे - सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन्‌ मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून निघालेल्या वैष्णवांचा मेळा शनिवारी रात्री पुण्यनगरीत विसावला. भागवत धर्माची पताका हाती घेतलेल्या वारकऱ्यांच्या संगे संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे आगमन होताच भक्तिमय वातावरणात झाले. 

संत तुकाराम महाराजांची पालखी निवडुंगा विठोबा देवस्थान (नाना पेठ) येथे रात्री नऊ वाजता, तर संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी रात्री दहा वाजता विठ्ठल मंदिर (भवानी पेठ) येथे मुक्कामी पोचली. रविवारी (ता. ८) दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यनगरीतच राहणार आहे. सोमवारी (ता. ९) पहाटे दोन्ही मंदिरांतील विठ्‌ठल-रुक्‍मिणीच्या मूर्तींची विधिवत पूजा झाल्यावर दोन्ही संतांच्या चांदीच्या पादुकांवर अभिषेक होईल. काकड आरती झाल्यानंतर पालख्या मार्गस्थ होतील. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यापाठोपाठ संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मार्गस्थ होईल. त्या पाठोपाठ ‘सकाळ माध्यम सूमहा’ची दिंडी असेल.  पुणे-सोलापूर रस्त्यावरील पुलगेट बसस्थानक येथे सकाळी सात वाजता ही दिंडी निघेल. या दिंडीत पुणेकरांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’तर्फे करण्यात आले आहे. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेच्या हद्दीत शनिवारी दोन्ही पालख्यांचे आगमन झाल्यानंतर महापौरांच्या वतीने स्वागत करण्यात आले. पालखी मार्गावर राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतील नागरिकांतर्फे दोन्ही पालख्यांचे स्वागत आनंदोत्सवात होत होते. बहुतांश ठिकाणी भाविक भक्तिगीते म्हणत वारकऱ्यांच्या सेवेत मग्न झाले होते. स्वयंसेवी संस्था, हौशी समूह, तसेच सामाजिक संस्थांतर्फे वारकऱ्यांसाठी मिष्टान्नाची व्यवस्थाही करण्यात येत होती. दर वर्षीप्रमाणे यंदाही तरुणाई पालखी सोहळ्यात सहभागी होऊन सेल्फी काढत होती. पालखी मार्गावर अनेक ठिकाणी ‘साथ चल’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करणारे फलक राजकीय, सामाजिक व सेवाभावी संस्थांनी लावले होते. श्रीशिव प्रतिष्ठानच्या हजारो कार्यकर्त्यांसमवेत संभाजी भिडे यांनी दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतले.

महापौरांकडून स्वागत
पुणे महापालिकेच्या वतीने वाकडेवाडी येथे महापौर मुक्ता टिळक यांनी दोन्ही पालख्यांचे स्वागत केले. संत तुकाराम महाराजांच्या पालखीनंतर गवरशेठ वाणी व संताजी जगनाडे महाराज यांच्या पालख्या मार्गस्थ झाल्या. हजारोंच्या संख्येने पालखी सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी आलेले भाविकही मोबाईलच्या कॅमेऱ्यात सोहळ्याची क्षणचित्रे टिपत होते. फेसबुक लाइव्हद्वारे सोहळ्याचा आनंदही भाविकांनी घेतला. रांगोळीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा उपक्रम समर्थ रंगावली समूहातर्फे राबविण्यात आला. जाणीव संघटनेतर्फे तंबाखू मुक्त महाराष्ट्र घडविण्याचा संदेश देण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal sant dnyaneshwar maharaj palkhi sant tukaram maharaj palkhi in pune