#SaathChal आई-वडिलांच्या सेवेची वैष्णवांच्या साक्षीने शपथ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 June 2019

अशी आहे शपथ
आषाढी वारीनिमित्त पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघालेल्या संतांच्या साक्षीने शपथ घेतो, की माझे घर माझे मंदिर आहे. त्या मंदिरातील दैवत माझे आई-वडील आहेत. त्यांची सेवा हीच ईश्‍वर सेवा आहे, असे मानून मी त्यांची जन्मभर सेवा करेन. त्यांचे सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य हे माझे प्राधान्य असेल, अशी मी ग्वाही देतो. भक्त पुंडलिकाप्रमाणे माझे वर्तन राहील, अशी सुबुद्धी मला मिळो, अशी मी विठ्ठल चरणी, संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या चरणी प्रार्थना करीत आहे.

पिंपरी - आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेला तुकोबारायांचा पालखी सोहळा देहूकरांचा निरोप घेऊन मंगळवारी (ता. २५) सायंकाळी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोचला. टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबाऽ तुकाराम’चा जयघोष झाला. पालखी रथातून उतरवून मंदिरात पोचविल्यानंतर समाज आरती झाली. त्या वेळी देहू संस्थानचे अध्यक्ष, सोहळा प्रमुख व विश्‍वस्तांतर्फे उपस्थित भाविकांना ‘आई-वडिलांच्या सेवेची’ शपथ देण्यात आली.

‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ नामाचा अखंड सुरू असणारा गजर, टाळ-मृदंगात दंग झालेले वारकरी, अशा वातावरणात भाविकांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात स्वागत केले. सायंकाळी सातच्या सुमारास मानाचे अश्‍व, विणेकरी यांच्यासह पालखी मंदिरात दाखल झाली. भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’ यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘साथ चल’ उपक्रमाला शहरातील नागरिक व वारकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. माणिक महाराज मोरे यांनी भाविकांना ‘आई-वडिलांची सेवा’ करण्याची शपथ दिली. दरम्यान, विठ्ठल मंदिर परिसरात सकाळपासून विठुनामाचा गजर सुरू होता. दुपारनंतर जत्रेचे स्वरूप आले. आवारात आकर्षक रांगोळी काढली होती. अनेकांनी इमारतींवर उभे राहून सोहळा अनुभवला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SaathChal Wari 2019 Palkhi Sohala Mother Father Service Oath