esakal | #SaathChal वारीत घटले प्लॅस्टिक वापराचे प्रमाण
sakal

बोलून बातमी शोधा

भांडगाव (ता. दौंड) - वारकऱ्यांना पोहे देण्यासाठी गावकऱ्यांनी पारंपरिक द्रोण वापरले.

#SaathChal वारीत घटले प्लॅस्टिक वापराचे प्रमाण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

केडगाव - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदा प्लॅस्टिकचे प्रमाण सत्तर टक्के घटले आहे. पालखी मार्गावरील गावकरी व वारकरी यांच्या जागृतीमुळे हे शक्‍य झाले. 

राज्य सरकारची प्लॅस्टिकबंदी वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने सरकारने प्लॅस्टिकबंदी शिथिल केली. सरकारचा निर्णय काय असेल तो असेल; मात्र गावकरी व वारकऱ्यांनी प्लॅस्टिकला दूर ठेवल्याचे चित्र दिसून आले. वारीत चहा, पोहे, उपमा, बुंदी, खिचडी सारखे पदार्थ वाटप करण्यासाठी गावकऱ्यांनी कागदी साहित्याचा वापर केला. वारकरी व गावकऱ्यांनी प्लॅस्टिकबंदी गांभीर्याने घेतल्याने वारीच्या वाटेवरील प्लॅस्टिकचा खच यंदा दिसला नाही.  

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सुमारे चार लाख वारकरी सहभागी होतात. वारीत दररोजच्या वापरासाठी मोठ्याप्रमाणावर प्लॅस्टिकचा वापर होत असतो. पिण्याचे पाण्याचे ग्लास, थर्माकोलची पत्रावळी, चहाचे ग्लास, अन्न पदार्थांचे पॅकिंग यांचा मोठा वापर होत असतो. सर्व प्लॅस्टिक वापरा आणि फेका असेच असते. त्यामुळे पालखी मार्गावरील प्रत्येक गावाला प्लॅस्टिक कचऱ्याची मोठी समस्या भेडसावत असते. हा कचरा पर्यावरणाला हानिकारक असल्याने त्याचे दूरगामी परिणाम होतात. त्यामुळेच वारीच्या वाटेवर यंदा वारकऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी स्टीलचे ग्लास वापरले. तर चहासाठी कागदी ग्लासचा वापर करण्यात आला. 

जेवणासाठी अनेक दिंड्यांनी थर्माकोलच्या पत्रावळीपेक्षा स्टीलची ताटे व ग्लास आणण्याची सूचना वारकऱ्यांना आधीच दिल्या होत्या. या बदलामुळे पारंपरिक व कागदी पत्रावळी रस्त्याच्या कडेला दिसत होत्या. पाण्याच्या बाटल्या पाणी पिल्यानंतर फेकल्या जातात. या बाटल्याही यंदा नेहमीपेक्षा कमी दिसल्या. एकूणच प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला.