#SaathChal पुण्यनगरी भक्‍तिमय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 July 2018

पुणे - भूपाळी, हरिपाठ, संतांचे अभंग गात विठ्ठल नामात तल्लीन झालेले पुणेकर रविवारी वारकऱ्यांच्या सेवेत रममाण झाले. हजारो भाविकांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्‍तींनी संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. ‘साधू-संत येती घरा तोचि दिवाळी दसरा...’ या भावनेने अनेकांनी अन्नदान केले. संपूर्ण शहरात दिवसभर अनेक ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन केले होते. दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचनासह भारुडे गात वारकऱ्यांसोबत पुणेकरांनी भगवंताच्या सेवेत आपला वेळ सार्थकी लावला.  

पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ) येथे आणि निवडुंगा विठोबा देवस्थान (नाना पेठ) येथील मंदिरांत विठ्ठल-रुक्‍मिणीच्या मूर्तींची पहाटे विधिवत षोड्‌शोपचारे पूजा झाली. काकड आरती झाल्यावर संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांवर अभिषेक झाला. दोन्ही मंदिरांत आलेल्या भाविकांनी संतांच्या पादुकांचे दर्शन घेतले. महिला व पुरुषांना दर्शन घेता यावे, याकरिता दोन्ही मंदिरांच्या बाहेर व्यवस्था उभारण्यात आली होती. बाहेर मंडप उभारल्याने पावसामुळे भाविकांची गैरसोय झाली नाही. सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक, विद्यार्थीदेखील येणाऱ्या भाविकांना सहकार्य करीत होते. 

परंपरेनुसार संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये तुकोबांच्या चांदीच्या पादुकांसोबत संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या तांब्याच्या पादुकांचे दर्शनही भाविकांना घडले. फुलांनी सजविलेल्या संतांच्या पालखीरथासोबत सेल्फी काढणारे तरुण-तरुणी, पोलिसांना मदत करणारी तरुणाई, तर कुठे वारकऱ्यांची सेवा करण्याचा आनंद लुटणारी तरुणाई, असे दृष्यही शहरभर पाहायला मिळाले. पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांनी पुणे मुक्कामी शनिवारवाडा, लालमहाल, पर्वती, सारसबाग, तळ्यातला गणपती, तसेच शहरातील विविध मंदिरांना भेटी देऊन पर्यटनाचा आनंद घेतला.

फडणवीस, शहा यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी रविवारी ज्ञानेश्‍वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. या वेळी देवस्थानच्या वतीने स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नेत्यांच्या आगमनाच्या वेळी दर्शन थांबविण्यात आले होते. 

पालखीच्या आगमनाप्रीत्यर्थ विठ्ठल-रुक्‍मिणीच्या मूर्तीला अलंकारांसहित सजविण्यात येते. हजारो भाविक पादुकादर्शनाचा लाभ घेण्यासाठी दर वर्षी येथे येतात. 
- आनंद पाध्ये, व्यवस्थापक, निवडुंगा विठोबा देवस्थान

मंदिराला ऐतिहासिक परंपरा आहे. दर वर्षी संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी या मंदिरातच मुक्कामी असते. या निमित्ताने माउलींची आणि वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य मिळते. दिवसभर लाखो भाविकांनी येथे दर्शन घेतले.
- तेजेंद्र कोंढरे, अध्यक्ष, पालखी विठ्ठल मंदिर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018