उरुळी कांचनला पालखीमार्गाची स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 July 2018

उरुळी कांचन - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान गावामध्ये निर्माण झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छतादूतांनी संपूर्ण पालखीमार्गाची स्वच्छता केली.

उरुळी कांचन - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान गावामध्ये निर्माण झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छतादूतांनी संपूर्ण पालखीमार्गाची स्वच्छता केली.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता. १०) दुपारी संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारच्या विसाव्यासाठी थांबली होती. या वेळी परिसरातील नागरिक, सामाजिक संस्था यांनी वारकऱ्यांना दिलेल्या अल्पोपाहार, चहा, बिस्किटे, फळे, जेवण आदींमुळे पालखी मार्ग व परिसरात अस्वच्छता पसरली होती. पालखीच्या प्रस्थानानंतर सुमारे ३०० स्वच्छतादूतांनी साडेतीन ते साडेसहा यावेळेत ग्रामपंचायतीच्या घंटागाडीच्या मदतीने पालखी मार्गाची स्वच्छता केली. यामध्ये उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्या, मंडलाधिकारी, पोलिस अधिकारी, महिला मंडळाच्या सदस्या, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, अंगणवाडी सेविका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.

यंदा कचऱ्याचे प्रमाण कमी
या वेळी नायब तहसीलदार सुनील शेळके, गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे यांनी स्वच्छतादूतांचे अभिनंदन केले. उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे पालखी मार्ग स्वच्छतेचे हे तिसरे वर्ष होते. दरम्यान लोकांमध्ये स्वच्छतेबाबत असलेली जागृती व प्लॅस्टिकची बंदी यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात कचऱ्याचे प्रमाण कमी होते, अशी माहिती स्वच्छता ग्रुपच्या सदस्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uruli Kanchan Palkhi route cleaning