Wari 2019 : अवघी दुमदुमली अलंकापुरी...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

दर्शनासाठीची रांग नदीपलीकडे
माउलींच्या मंदिरात समाधी दर्शनासाठी मंगळवारी पहाटेपासून गर्दी होती. दर्शनासाठीची रांग नदीपलीकडे गेली होती. दुपारी बारानंतर मात्र वारकऱ्यांना वेध लागले ते मुख्य प्रस्थानाच्या कार्यक्रमाचे. माउलींच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेडिंग करून फक्त दिंड्यांनाच सोडण्याचे नियोजन केले होते. माउलींच्या मंदिराकडे जाणाऱ्यांना प्रस्थान काळात इतरांना प्रवेश बंदी होती. दुपारच्या प्रस्थान सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी वारकऱ्यांची पावले मंदिराच्या दिशेने सरकत होती. दोनच्या सुमारास मानाच्या दिंड्यांना भराव रस्त्यावरून एकेक करून दिंड्या मंदिरात प्रवेश देण्यात आला. या वेळी प्रदक्षिणा रस्त्यावरही प्रस्थान सोहळा आणि माउलींच्या पालखीचे दर्शनासाठी वारकऱ्यांची दाटी होती. त्यानंतर प्रस्थानाचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला.

आळंदी -  
नाम गाऊ नाम घेऊ । 
नाम विठोबाला वाऊ।। 
आमि दहिवाचे दहिवाचे। 
दास पंढरीरायाचे।। 
टाळ वीणा घेऊनि हाती। 
केशवराज गाऊ किती।। 

ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि खांद्यावरील भगव्या पताका उंचावत वैष्णवांच्या मेळ्याने इंद्रायणीचे दोन्ही तीर आणि अवघी अलंकापुरी टाळ-मृदंगाचा गजर आणि माउली नामाच्या अखंड नामघोषाने मंगळवारी दुमदुमून गेली.

घराण्यात परंपरेने चालत आलेली आपली वारी विठुराया चरणी समर्पित करण्यासाठी वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगाचा निनाद अन्‌ ज्ञानोबा, माउली, तुकोबांचा अखंड जयघोष कानी पडत होता.

साडेचारशेहून अधिक छोट्यामोठ्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. रथापुढे सत्तावीस दिंड्या, रथामागे दोनशे एक आणि तात्पुरते नंबर दिलेल्या सुमारे साडेचारशेहून अधिक दिंड्या वारीत सहभागी होण्यासाठी आळंदीत दाखल झाल्या आहेत. गेले दोन दिवस पावसाची रिमझिम असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह होता. मंगळवारी सकाळपासून सूर्यदर्शन झाले आणि कडक ऊन पडले होते. शहरात ठिकठिकाणी राहुट्या आणि धर्मशाळांमधून वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाचा जयघोष अन्‌ हरिनामाचा गजर, ज्ञानेश्‍वरी पारायण सुरू होते.

मंगळवारी पहाटेपासून इंद्रायणीत स्नानासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली होती. आंद्रा धरणातून पाणी सोडल्यामुळे वारकऱ्यांची सोय झाली. पोलिसांकडून वारंवार इंद्रायणी पाण्यात मध्यभागी न उतरण्याचे आवाहन करण्यात येत होते. वैष्णवांच्या या अलोट गर्दीने संपूर्ण इंद्रायणी परिसर  गजबजला होता.

शहरातील गल्ली-बोळांत वारकऱ्यांचे भजन आणि चाललेल्या दिंड्यांचे कुतूहल आळंदीकरांना होते. इंद्रायणी तीरावर विविध दिंड्या भजन, भारूड अन्‌ अखंड माउलींचा जयघोष होता. डोक्‍यावर मोरपिसारा असलेली टोपी घातलेल्या वासुदेवांची हाळी सुरू होती. भक्ती रसात तल्लीन झालेले वारकरी आनंदाने फुगड्या खेळत होते. वारकऱ्यांचे खेळ मोबाईल, कॅमेऱ्यात टिपण्यासाठी हौशी लोकांची गर्दी दिसून येत होती. मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा रस्त्यावर दुकानांची गर्दी झाली होती. ठिकठिकाणी भाविकांसाठी मोफत चहा नाश्‍त्याचे आयोजन आळंदीकरांकडून करण्यात आले होते.

पालिकेच्या वतीने भाविकांसाठी मध्यरात्रीपासून पाणीपुरवठा सुरू होता. स्वच्छतेसाठी पालिकेची मोठी यंत्रणा होती. नऊशे शौचालये उपलब्ध केल्याने वारकऱ्यांची सोय झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala Aashadhi Wari