esakal | Wari 2019 : भगव्या पताका, नामघोष, टाळ-मृदंगाची साथ
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदी - माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानप्रसंगी मंदिरात भगव्या पताका घेऊन दाखल झालेल्या दिंड्या.

Wari 2019 : भगव्या पताका, नामघोष, टाळ-मृदंगाची साथ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आळंदी -  
नाम गाऊ नाम घेऊ । नाम विठोबाला वाऊ।। 
आमि दहिवाचे दहिवाचे। दास पंढरीरायाचे।। 
टाळ वीणा घेऊनि हाती। केशवराज गाऊ किती।। 

ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि खांद्यावरील भगव्या पताका उंचावत वैष्णवांच्या मेळ्याने इंद्रायणीचे दोन्ही तीर आणि अवघी अलंकापुरी टाळ-मृदंगाचा गजर आणि माउली नामाच्या अखंड नामघोषाने मंगळवारी दुमदुमून गेली.

घराण्यात परंपरेने चालत आलेली आपली वारी विठुराया चरणी समर्पित करण्यासाठी वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगाचा निनाद अन्‌ ज्ञानोबा, माउली, तुकोबांचा अखंड जयघोष कानी पडत होता. रथापुढे सत्तावीस दिंड्या, रथामागे दोनशे एक आणि तात्पुरते नंबर दिलेल्या सुमारे साडेचारशेहून अधिक दिंड्या वारीत सहभागी होण्यासाठी आळंदीत दाखल झाल्या आहेत. मंगळवारी पहाटेपासून इंद्रायणीत स्नानासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली होती. इंद्रायणी तीरावर विविध दिंड्या भजन, भारूड अन्‌ अखंड माउलींचा जयघोष होता. भक्ती रसात तल्लीन झालेले वारकरी आनंदाने फुगड्या खेळत होते. वारकऱ्यांचे खेळ मोबाईल, कॅमेऱ्यात टिपण्यासाठी हौशी लोकांची गर्दी दिसून येत होती. भाविकांसाठी मोफत चहा नाश्‍त्याचे आयोजन आळंदीकरांकडून करण्यात आले होते. नदीकाठी महिलांसाठी कपडे बदलण्याकरिता चेंजिंग रूम उभारले आहेत. 

दर्शनासाठीची रांग नदीपलीकडे
माउलींच्या मंदिरात समाधी दर्शनासाठीची रांग नदीपलीकडे गेली होती. दोनच्या सुमारास मानाच्या दिंड्यांना भराव रस्त्यावरून एकेक करून दिंड्या मंदिरात प्रवेश देण्यात आला. प्रस्थानाचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला.