Wari 2019 : अलंकापुरीत रंगला माउलींचा प्रस्थान सोहळा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 June 2019

माउली नामाचा जयघोष, देहभान विसरून नाचणारे वैष्णव आणि त्यांना टाळ-मृदंगाची साथ... अशा वातावरणात आळंदीकर ग्रामस्थांनी वीणामंडपातील पालखी बाहेर आणली अन्‌ लाखो भाविकांच्या उपस्थितीत ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’चा गजर झाला. भक्तिरसात चिंब झालेल्या वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने मंगळवारी सायंकाळी सव्वासात वाजता पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. यंदा प्रस्थान सोहळ्याला सुमारे सव्वा तास उशीर झाला. 

आळंदी - माउली नामाचा जयघोष, देहभान विसरून नाचणारे वैष्णव आणि त्यांना टाळ-मृदंगाची साथ... अशा वातावरणात आळंदीकर ग्रामस्थांनी वीणामंडपातील पालखी बाहेर आणली अन्‌ लाखो भाविकांच्या उपस्थितीत ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’चा गजर झाला. भक्तिरसात चिंब झालेल्या वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने मंगळवारी सायंकाळी सव्वासात वाजता पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. यंदा प्रस्थान सोहळ्याला सुमारे सव्वा तास उशीर झाला. 

माउलींच्या पालखीचा देखणा प्रस्थान सोहळा डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होता. पहाटेपासूनच देऊळवाड्याकडे जाण्यासाठी गर्दी झाली. पहाटे घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक या नैमित्यिक कार्यक्रमानंतर प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू झाली. इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर तीर्थस्नानासाठी गर्दी होती. दुपारी दीडपर्यंत दर्शन सुरू होते. त्यानंतर समाधी दर्शन बंद करण्यात आले. माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून गळ्यात तुळशीहार आणि गुलाबपुष्पाचा हार घालून डोक्‍यावर चांदीचा मुकुट ठेवून ती ब्रह्मवृंदांनी सजविली. माउलींचे हे लोभस रूप डोळ्यांत साठवीत भाविकांनी हरिनामाचा गजर केला.

दरम्यान, वीणामंडपातील फुलांनी सजविलेली पालखी ‘पुंडलिका वरदा हरी विठ्ठल हरी विठ्ठल’चा घोष करीत आळंदीकरांनी खांद्यावर घेतली. पालखी मंदिराबाहेर येताच वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. पालखीने मंदिर प्रदक्षिणा केली व महाद्वारमार्गे नगरप्रदक्षिणेला बाहेर पडली. समाज आरतीनंतर पालखी मुक्कामी विसावली. उद्या सकाळी सहाला पालखी पुण्याच्या दिशेने दोन दिवसांच्या मुक्कामी मार्गस्थ होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala Aashadhi Wari Alandi