esakal | Wari 2019 : पंढरीची वारी पावसामुळे ठरली आनंदाची
sakal

बोलून बातमी शोधा

Dnyaneshwar-Gavhane

सोहळ्यावर पावसाचे छत्र
हडपसरच्या टप्प्यात तासापेक्षाही जास्त काळ पावसाने सोहळ्यावर बरसात केली. सोहळ्याचा विसावा होता, तरीही त्रेधातिरपीट उडाली नाही. सोहळा विसावा आटोपून मार्गस्थ झाला तरीही पाऊस सुरूच होता. यावेळी शिस्त नजरेत भरणारी होती. मांजरी फार्मपासून पावासाचा जोर ओसरला. लोणी काळभोर परिसरात सायंकाळी पुन्हा सर येऊन गेली. दिवसभराच्या आजच्या प्रवासात पालखी सोहळ्याला पावसाने चिंब भिजवले होते.

Wari 2019 : पंढरीची वारी पावसामुळे ठरली आनंदाची

sakal_logo
By
सचिन शिंदे

लोणी काळभोर - ‘‘बीडला पाऊस नाही. मात्र पालखी सोहळ्यात पाऊस अनुभवला. चिंब भिजलो, त्यामुळे पालखी सोहळा आनंदाचा ठरला. तिसरी वारी आहे. सोहळ्यातील शिस्त मनाला भिडली. त्यामुळे ती शिकण्यासाठी आषाढी वारीकडे पावले वळतात,’’ अशी भावना बीडचा युवा वारकरी ज्ञानेश्वर गव्हाणे याने व्यक्त केली.

पुण्याहून निघालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हडपसरमध्ये पावसात चिंब भिजला. पावसाची मोठी सर आल्याने शेतकरी सुखावला. तेच सुखाचे टपोरे थेंब अंगावर झेलत लोणी काळभोरचे अंतर त्यांनी कापले. मुळातच सुखाची अनुभूती देणाऱ्या पालखी सोहळ्यात पावसाने लावलेली हजेरी वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित करणारी ठरली. निवडुंगा विठ्ठल मंदिरातून आज पहाटे पालखी सोहळा मार्गस्थ झाला. वाटेत ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस आला नाही. भैरोबा नाला येथे विसावा झाला तरीही भरून आलेले ढग काही कोसळत नव्हते. वारकऱ्यांचे लक्ष अभंगातही होते अन्‌ ढगांकडेही. 

हडपसरला पालखी सोहळा आला अन्‌ पावसाच्या सरी कोसळू लागल्या. वारकरी सुखावला. विदर्भ, मराठवाड्यातून आलेला वाररकरीही पावसाचे थेंब अंगावर घेत आनंदी होताना दिसत होता. त्याच भागातील एका दिंडीतील तरुण आंनदाने गावकडे पावसाची बातमी मोबाईल फोनवर सांगत होता. त्याचे नाव ज्ञानेश्वर गव्हाणे. पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या या युवा वारकऱ्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. मात्र, बीडमध्ये पाऊस नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.