वारी हे समानतेचे प्रतीक - नीलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

'वारी नारीशक्तीची’ या उपक्रमात अनेक महिलांविषयी उपक्रमांचा समावेश केला आहे. महिलांचा पालखीतील सहभाग पाहून हे कार्य वारीपासून सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. 
- विजया रहाटकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग 

पुणे - ‘‘पालखीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. वारी हे प्रबोधनाचे पहिले व्यापक पाऊल आहे. वारीच्या निमित्ताने वारकरी जातपात बाजूला ठेवून एकत्र जमतात. त्यामुळे वारी हे समानतेचे प्रतीक आहे,’’ असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

राज्य महिला आयोगातर्फे महिला सक्षमीकरण, सबलीकरण आणि समानतेसाठी ‘वारी नारीशक्तीची’ हा उपक्रम राबविण्यात आला, त्या वेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, डॉ. सदानंद मोरे, उषा वाजपेयी, मंजूषा मुळवणे, योगेश गोगावले, राखी रासकर उपस्थित होत्या. 

या वेळी सक्षमा प्रकल्पाचे उद्‌घाटनही केलेे. यात राष्ट्रीय आरोग्य संस्था, आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय सेवायोजनेचा सहभाग होता. तसेच, पारंपरिक पोशाखात मुलींचा व ढोल-ताशा पथकाचाही यात सहभाग होता.

डॉ. मोरे म्हणाले, ‘‘महिला आयोगाने वारकऱ्यांच्या प्रबोधनाचे काम सुरू केले, हे कौतुकास्पद आहे. या वारीत सर्वांनाच सारखे स्थान आहे. वारीत पूर्वीपासूनच महिला-पुरुष असा दुजाभाव नाही. त्यामुळे महिलांसाठी काम करायचे असेल, तर वारीला जोडले जाणे गरजेचे होते.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Wari Narishaktichi Neelam Gorhe Palkhi Sohala Aashadhi Wari