रंगणार कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाची दशकपूर्ती 

10 years of Kothrud cultural fest
10 years of Kothrud cultural fest

पुणे : 'संस्कृती प्रतिष्ठान'तर्फे येत्या एक ते चार फेब्रुवारी दरम्यान कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचा दशकपूर्ती सोहळा रंगणार आहे. संगीतमार्तंड पंडित जसराज यांना हा सोहळा समर्पित असून त्यांच्या सांगीतिक योगदानाचे विविध पैलू यात उलगडले जातील. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत सविस्तर माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी योगेश देशपांडे व विनोद सातव उपस्थित होते. ते म्हणाले, " कोथरूडमधील आयडियल मैदानावर सायंकाळी सहा ते दहा या वेळेत होणाऱ्या या महोत्सवात गायन, वादन, नाट्य व सांगीतिक चर्चा असा मेळ साधला जाईल. महोत्सवाचे सुरवातीचे दोन दिवस योगेश देशपांडे यांच्या संकल्पनेतून 'रसराज सन्मान सोहळा' साकारण्यात येईल. "

पहिल्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, दिग्दर्शक जब्बार पटेल व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पं. जसराज यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. यानंतर पं. जसराज स्कूल ऑफ म्युझिक फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचे गायन होईल.  जसराज यांचे नातू स्वर शर्मा गायन सादर करतील. प्रसिद्ध सरोदवादक अमजदअली खाँ यांची प्रस्तुती, उस्ताद तौफिक कुरेशी व शिखरनाद या नामवंत जेंबेवादकांचे सहवादन व ख्यातनाम गायक हरिहन यांच्या गझलगायनाचा आनंद रसिकांना लुटता येईल. 

दुसऱ्या दिवसाचा आरंभ राकेश चौरसिया यांच्या बासरीने होऊन पं. जसराज यांचे शिष्य पं. संजीव अभ्यंकर व विदुषी अश्विनी भिडे - देशपांडे यांची जसरंगी जुगलबंदी अनुभवायला मिळेल. उत्तरार्धात पं हरिप्रसाद चौरसिया, डॉ. प्रभा अत्रे व पं. हृदयनाथ मंगेशकर हे दिग्गज जसराज यांच्याशी त्यांच्या सांगीतिक योगदानाबद्दल मनमोकळ्या हितगुज साधतील. तिसऱ्या दिवशी पुण्यातील रामकृष्ण मठ निर्मित 'युगनायक विवेकानंद' हे महानाट्य सादर होणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो धर्मपरिषदेतील ऐतिहासिक भाषणाला एकशे पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होणाऱ्या या नाटकाचे लेखन स्वामी श्रीकांतानंद व नाट्य तसेच संगीत दिग्दर्शन केदार पंडित यांनी केले आहे. शेवटच्या दिवशी ( मंगळवारी) दूरचित्रवाणीवर गाजणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या लाइव्ह एपिसोडने महोत्सवाची सांगता होईल. 

प्रतिष्ठानतर्फे दर वर्षी महोत्सवात कोथरूडमधील नामवंत कलावंतांना पुरस्कार दिला जातो. या वर्षी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सुहास व्यास यांना ' संस्कृती कला जीवनगौरव पुरस्कार' व प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांना ' संस्कृती कला पुरस्कारा'ने गौरविण्यात येणार आहे. मानपत्र, मानचिन्ह व विशिष्ट रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com