"पीएमपी'ला स्थायी समितीचा "बूस्टर'; 110 कोटींच्या निधीला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने "पीएमपी'ला 110 कोटी, तर चांदणी चौकाच्या भूसंपादनासाठी 60 कोटी रुपयांचा निधी गुरुवारी मंजूर केला. त्यामुळे वाहतुकीच्या प्रकल्पांना बूस्टर मिळणार आहे.

पुणे - शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने "पीएमपी'ला 110 कोटी, तर चांदणी चौकाच्या भूसंपादनासाठी 60 कोटी रुपयांचा निधी गुरुवारी मंजूर केला. त्यामुळे वाहतुकीच्या प्रकल्पांना बूस्टर मिळणार आहे. 

"पीएमपी'ला 110 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असले, तरी तातडीने 30 कोटी रुपये दिले जाणार असून, पंधरा दिवसांत 30 कोटी आणि उर्वरित रक्कम मार्चअखेर दिली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. लॉकडाउनमुळे पीएमपीची सुमारे सहा महिने प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे मोठा तोटा सहन करावा लागला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडे मागणी केलेली रक्कम मिळाली नाही तर, वाहतूक सुरू ठेवणे अवघड होणार असल्याचेही म्हटले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चांदणी चौकातील नियोजित उड्डाण पुलासाठी राज्य सरकारने सुमारे 100 कोटी रुपयांचा निधी यापूर्वी दिला आहे. अजून 74 कोटी रुपये येणे अपेक्षित होते; परंतु राज्य सरकारकडे सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळे महापालिकेने हा निधी द्यावा. त्यांना मार्चपर्यंत हा निधी परत करू, अशी विनंती राज्य सरकारने केली होती. त्यानुसार चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठी 60 कोटी रुपये देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे, असे रासने यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अजित पवार 11 वर्षांनी "पीएमपी'त 
उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल 11 वर्षांनंतर शुक्रवारी (ता. 16) सायंकाळी पाच वाजता "पीएमपी'मध्ये येणार आहे. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या उपक्रमाच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असून, कार्यक्रमाचे संयोजन पीएमपी करणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन 25 ऑक्‍टोबरपर्यंत शहरात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती करणार आहे. 

पीएमपीला असलेली प्रमुख देणी 

- निवृत्त कर्मचारी रजा रोखीकरण ः सुमारे 30 कोटी 
- भाडेतत्त्वावरील बसचे भाडे ः सुमारे 25 कोटी 
- सीएनजी (सप्टेंबरअखेर) ः समुारे 21 कोटी 
- कर्मचारी वैद्यकीय बिले ः सुमारे 10 कोटी 
- बसचे सुटे भाग ः सुमारे 2.5 कोटी 

लॉकडाउनमध्ये पीएमपीला झालेला तोटा  - सुमारे 200 कोटी 

पुणे महापालिकेचा वाटा  - 110 कोटी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वाटा  - 73 कोटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 110 crore to PMP by the Municipal Standing Committee to solve the traffic problem in the city