पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १२१ टीएमसी पाणीसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khadakwasala-Dam-Water
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १२१ टीएमसी पाणीसाठा

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १२१ टीएमसी पाणीसाठा

पुणे - पुणे जिल्ह्यातील टाटांची पाच धरणे वगळता उर्वरित २६ धरणांमधील मिळून एकूण पाणीसाठा हा मंगळवारी (ता.१९) १२०.७४ टीएमसी इतका झाला आहे. या धरणांमधील पाणी साठ्याचे हे प्रमाण या धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्याच्या ६०.८८ टक्के इतके झाले आहे. सध्या जिल्ह्यातील २६ पैकी पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणासह आंद्रा आणि कलमोडी ही तीन धरणे फूल झाली आहेत. गेल्या वर्षीच्या या तारखेच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात सुमारे तिप्पटीने वाढ झाली आहे. दरम्यान, पुरंदर तालुक्यातील नाझरे हे धरण अद्यापही कोरडे ठणठणीत आहे.

गेल्या वर्षी आजअखेरपर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ४२.६६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. गतवर्षीच्या या पाणीसाठ्याचे प्रमाण हे केवळ २१.५१ टक्के इतके होते. दरम्यान, टाटांच्या मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण आणि लोणावळा या पाच धरणांमध्ये मिळून २३.७४ टीएमसी पाणी जमा झाले आहे. या धरणांमधील पाणीसाठ्याचे हे प्रमाण ५५.८१ टक्के इतके झाले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्याच्या अखेरीस पिंपळगाव जोगे, मुळशी, टेमघर आणि नाझरे ही चार धरणे कोरडी पडली होती. शिवाय उजनीतील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला होता, असे जलसंपदा विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या धरण साठा आकडेवारी अहवालातून उघडकीस होते. जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. या सर्व धरणांतील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा क्षमता ही २१७.८६ टीएमसी इतकी आहे. यापैकी गेल्या वर्षभरात २००.९७ टीएमसी पाणी वापरले गेले होते. परिणामी केवळ १६.८९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यात आता भरीव वाढ होऊन तो १२१ टीएमसीवर गेला आहे.

प्रमुख धरणांचा १९ जुलैचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

- माणिकडोह--- ४.७६

- येडगाव --- १.७८

- वडज --- ०.८९

- डिंभे --- ७.१०

- चासकमान --- ७.१८

- भामा आसखेड --- ६.२८

- आंद्रा --- २.९२

- पवना --- ५.५७

- वरसगाव --- ७.५०

- पानशेत --- ६.९४

- खडकवासला --- १.९७

- गुंजवणी --- २.९२

- भाटघर --- १४.११

- वीर --- ९.२१

- टेमघर --- १.८५

- नीरा देवघर --- ६.२३

टाटांच्या धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

- मुळशी --- १२.७६

- ठोकरवाडी --- ६.५८

- शिरोटा --- २.६३

- वळवण --- १.४४

- लोणावळा --- ०.३३

Web Title: 121 Tmc Water Storage In Pune District Dams

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top