#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

पुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन महिने बेकायदा होर्डिंगचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या मोहिमेत महापालिकेच्या हाती  १३१ होर्डिंग लागली आहेत. ही होर्डिंग लावणाऱ्यांना नोटिसा बजाविण्याचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला असून, कारवाईनंतर ते पुन्हा उभारणार नाहीत याची व्यवस्था करण्याकडे मात्र यंत्रणेने काणाडोळा केला आहे. दरम्यान, कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. 

शहर आणि उपनगरांत सध्या एक हजार ८८६ अधिकृत होर्डिंग असल्याची नोंद आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे आहे. तसेच ११३ होर्डिंग विनापरवानगी असल्याचे या विभागातून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र रस्ते आणि चौकालगत सर्रास बेकायदा होर्डिंग दिसत असून, त्यांचा आकडा कमी दाखविल्याने महापालिकेच्या कारभाराबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. 

खबरदारीचा उपाय म्हणून बेकायदा होर्डिंग मालकांविरोधात कठोर कारवाईची घोषणा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली होती. त्यानंतर आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरात मोहीम राबवून पहिल्या आठवड्यात २२ होर्डिंग पाडली. त्यानंतर मात्र मोहीम थंडावल्याची चर्चा होताच ती पुन्हा सुरू करून आतापर्यंत म्हणजे गेल्या दोन महिन्यांत १३१ होर्डिंग पाडल्याची नोंद दाखविण्यात आली आहे. 

शहरात अनेक ठिकाणी परवानगी न घेता आणि परवानगीपेक्षा अधिक जागेत होर्डिंग उभारल्याच्या तक्रारी आहेत. तरीही काही मोजक्‍याच होर्डिंगवर कारवाई केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बेकायदा होर्डिंग उभारणाऱ्यांना महापालिका यंत्रणेचा धाक राहिलेला नाही, हे स्पष्ट होते. 

जीव गमावूनही महापालिका ढिम्मच
शहरांमधील होर्डिंग धोरण आणि त्याची परिणामकारकता मांडण्यात यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. मुंबई आणि पुण्यातील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर हा आदेश दिला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या होर्डिंग पॉलिसीची काटेकोपरणे अंमलबजावणी होण्याची आशा होती. मंगळवार पेठेतील दुर्घटनेत चौघांचा जीव गेल्यानंतर महापालिकेने ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही.  

ज्या भागात परवानगी न घेता होर्डिंगचे सांगाडे उभारले आहेत, त्या मालकांना नोटिसा दिल्या होत्या. मात्र, ते काढले नसल्याने कारवाई करण्यात आली आहे. उपनगरांमधील होर्डिंग पाडण्यात आली असून, त्याकरिता संबंधित मालकांकडील कागदपत्रे तपासण्यात येत आहेत. त्यासाठी पथके नेमली आहेत.
-विजय दहिभाते, प्रमुख, आकाशचिन्ह व परवाना विभाग

बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्याबाबत महापालिकेकडे मागणी केली आहे. त्याबाबत गेल्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्तांसमवेतही बैठक झाली. बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, त्यांच्याविरोधात नियमित कारवाई व्हावी.’’
- बाळासाहेब गांजवे, पुणे आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन

Web Title: 131 hoardings illegal in the city