चाकणमधील वीस कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात छोट्या राजन टोळीचे कनेक्शन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

-नायजेरियन तरुणासह 14 जणांना अटक; रांजणगावमधील कंपनीत बनविले 132 कोटींचे मेफेड्रॉन.

-पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

पिंपरी : चाकण येथे दोन आठवड्यापूर्वी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केलेल्या वीस कोटींच्या मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज प्रकरणाचे कनेक्शन छोटा राजन टोळीपर्यंत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात पोलिसांनी छोटा राजन टोळीत पूर्वी सक्रीय असलेला सराईत गुन्हेगार व एका नायजेरियन व्यक्तीसह चौदा जणांना अटक केली आहे. या आरोपींनी रांजणगाव येथील एका बंद पडलेल्या फार्मा कंपनीत तब्बल 132 कोटी रुपये किंमतीचे  132 किलो मेफेड्रॉन ड्रग्ज तयार केल्याचे समोर आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तुषार सुर्यकांत काळे (रा. बोरीवली, मुंबई) आणि राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी (रा. वसई) आणि नायजेरियन व्यक्ती झुबी इफनेयी उडोको (नायगाव, वसई) यांच्यासह किरण राजगुरू, अशोक संकपाळ, किरण काळे, कुलदीप इंदलकर, ऋषीकेश मिश्रा आणि
जुबेर मुल्ला अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या गुन्ह्यात यापूर्वी चेतन दंडवते, आनंदगीर गोसावी, अक्षय काळे, संजिवकुमार राऊत आणि तौसिफ तस्लीम या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती पाहून पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सहा तपास पथके स्थापन केली होती. आरोपींनी रांजणगाव येथील संयोग बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत मेफेड्रॉन ड्रग्ज बनवले असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ड्रग्ज बनवण्याच्या मशिनरीसह ही कंपनी सील केली आहे.

पोलिसांच्या सहा पथकांनी कांदिवली, वसई, पालघर, नाशिक, नवी मुंबई, कर्जत आणि सहारा विमानतळ, मुंबई येथे सात दिवस तपास करत तुषार आणि राकेश या दोन्ही सूत्रधारांना ताब्यात घेतले. तुषार काळे हा सराईत गुन्हेगार असून छोटा राजन टोळीत तो पूर्वी सक्रीय होता. त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरी, हत्यार कायदा असे आठ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

त्यानंतर तो ड्रग्ज बनविण्याच्या धद्यांत आला. तर, राकेशच्या भावाला यापूर्वी मुंबईतील वेंâद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) जेरबंद केले आहे. तर राकेशला यापूर्वी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पालघर येथील एका कंपनीत अमली पदार्थ बनवण्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. एनसीबी राकेशच्या मागावर होती. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. झुबी हा नायजेरीयन असून, एका अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात कोल्हापूर कारागृहात दहा वर्ष शिक्षा भोगून आला आहे. त्याने त्याच्या व्हिसामध्ये देखील छेडछाड केल्याचे समोर आले आहे.

त्याबाबत त्याच्यावर स्वतंत्रपणे कारवाई केली जाणार आहे. आरोपी तुषार हा बनविलेले ड्रग्ज झुबी याला विकत असे. आरोपींपैकी किरण काळे हा रांजणगाव येथील स्टूका न्युट्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक आहे. त्याने तुषार काळे याला अशोक संकपाळ यांची बंद पडलेली संयोग बायोटेक लिमिटेड ही कंपनी ड्रग्ज बनविण्यासाठी उपलब्ध करून दिली. किरण काळे याने त्याच्या कार्यालयात इतर आरोपींसोबत बैठक घेऊन एक किलो ड्रग्ज बनवण्यासाठी 60 हजार रुपये असा दर ठरवला होता. तुषार काळे याने त्या बदल्यात एकूण 67 लाख रुपये दिले होते. कुलदीप इंदलकर, ऋषिकेश मिश्रा, जुबेर मुल्ला यांच्या मदतीने या कंपनीत सुमारे 132 किलो ड्रग्ज बनविण्यात आले. त्यातील 112 किलो ड्रग्ज तुषार काळे याने यापूर्वीच बाजारात विकले होते. उर्वरीत 20 किलो ड्रग्ज
हे अक्षय काळे याने त्याच्या घरी ठेवले होते. त्याची विक्री करण्यासाठी जात असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन आठवड्यापूर्वी चाकण-शिक्रापूर रस्त्यावर आरोपींना जेरबंद केले, अशी माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ही कामगिरी करणाऱ्या सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलिस आयुक्तांनी अभिनंदन केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ड्रग्जच्या पैशातून घेतली शेतजमीन- तुषार काळे आणि राकेश खानिवडेकर यांच्याकडून ड्रग्ज विक्रीतून आलेले 85 लाख रुपये रक्कम जप्त केली आहे. काळे याने पालघर जिल्ह्यातील
पालसाई येथे 75 लाख रुपये किमतीची दोन एकर शेतजमीन विकत घेतल्याची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. ती शेतजमीन ड्रग्ज विक्रीच्या पैशांतून घेतली असल्याने ती मालमत्ता देखील ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. तुषार काळे त्या जमिनीवर स्वतःची एक कंपनी सुरु करणार असल्याचे
निष्पन्न झाले आहे. तुषार आणि राकेश यांनी आणखी तीन ठिकाणी एमडी ड्रग्ज बनवले आहेत. पिंपरी-चिंचवड
पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 20 कोटी 90 लाख 23 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 132 crore mephedrone made by a company in Ranjangaon