esakal |  पुण्यात लसीकरण सुरळीत; 1378 ज्येष्ठ नागरिकांनी घेतली लस

बोलून बातमी शोधा

1378 Senior citizens vaccinated in pune corona Virus}

पुण्यात सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. त्यात ६० पेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि ४५ ते ५९ वयातील इतर व्याधी असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा गोंधळ महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुरू होता.

 पुण्यात लसीकरण सुरळीत; 1378 ज्येष्ठ नागरिकांनी घेतली लस
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे  : पुण्यात एका दिवसांत २७ केंद्रांमधून दोन हजार ५०४ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यात एक हजार ३७८ (५५ टक्के) ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. सहव्याधी असलेल्या २४८ जणांनी ही लस घेतली.

पुण्यात सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. त्यात ६० पेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि ४५ ते ५९ वयातील इतर व्याधी असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा गोंधळ महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुरू होता. ही परिस्थिती सुधारण्यासाठी महापालिकेने तातडीने लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली. ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी असलेली चार केंद्रांची संख्या बुधवारी २७ पर्यंत वाढविण्यात आली. त्यात बहुतांश महापालिकेच्या रुग्णालयांचा समावेश आहे. तसेच, काही तीन खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सशुल्क सुविधा उपलब्ध करण्यात आली. त्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, बुधराणी आणि ‘औंध इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ (एम्स) यांचा त्यात समावेश आहे.

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पाचशे ते हजार ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली होती. बुधवारी केंद्रांची संख्या वाढविल्याने एक हजार ३७८ पर्यंत ही संख्या वाढली असल्याची माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. केंद्रांची संख्या वाढल्याने केंद्रांवर लसीसाठी दोन दिवस दिसणारी गर्दी कमी करण्यात यश आल्याचेही दिसत होते.

दृष्टीक्षेपात लसीकरण
आरोग्य कर्मचारी पहिला डोस ......... १८२
आरोग्य कर्मचारी दुसरा डोस ........... २७०
फ्रंटलाइनर पहिला डोस .................. ३५४
फ्रंटलाइनर दुसरा डोस .................... ३
ज्येष्ठ नागरिक ............................. १३७८
सहव्याधी नागरिक ...................... १४८


खासगी रुग्णालयांकडे विचारणा
शहरातील काही खासगी रुग्णालयांमधून लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संपर्क साधण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शहरातील केंद्रांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. खासगी रुग्णालयांमधून प्रती डोस २५० रुपयांना मिळेल. त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. सरकारी यंत्रणांमधून सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांमध्ये मोफत लस घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, असेही खात्यातर्फे स्पष्ट केले.

अशी करा नावनोंदणी
- नावनोंदणीसाठी www.cowin.gov.in यावर लॉगिंन करा किंवा Cowin app वापरा
- रजिस्ट्रेशनवर क्लिक करून मोबाईल क्रमांक टाका
- त्यानंतर गेट ‘ओटीपी’वर क्लिक करा
- ‘एसएमएस’च्या माध्यमातून आलेला ‘ओटीपी’ नंबर टाकून ‘व्हिरिफाय’ करा
- ‘ओटीपी’ची पडताळणी झाल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर ‘रजिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिनेशन’ पान येईल
- यात वय आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र निवडा
- जन्मवर्ष, लिंग, सहव्याधी असा सर्व तपशील नोंदणी करताना भरावा
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर माहिती दिसेल


अत्यावश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड, वयाचा पुरावा असलेले ओळखपत्र (जन्माला
दाखला, पॅन कार्ड, पारपत्र)
- ४५ ते ५९ वर्षे वयातील व्याधीग्रस्त नागरिकांनी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने दिलेले प्रमाणपत्र केंद्रावर बरोबर आणावे

ज्येष्ठांसाठी ‘वॉक इन रजिस्ट्रेशन’
पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांना को-व्हिन पोर्टल किंवा ॲपमध्ये नावनोंदणी करताना अडथळे येत असल्याचे गेल्या दोन दिवसांपासून स्पष्ट दिसत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने ही ‘वॉक इन रजिस्ट्रेशन’ची सुविधा उपलब्ध केली आहे. कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ, जयाबाई सुतार रुग्णालय, कोथरूड, राजीव गांधी रुग्णालय, येरवडा, ससून रुग्णालय, पुणे स्टेशन या केंद्रांवर नावनोंदणी करून लस मिळेल.