राज्यात वर्षभरात डेंगीचे १४ हजार ८८८ रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

राज्यात वर्षभरात डेंगीचे १४ हजार ८८८ रुग्ण आढळले. त्यापैकी एकट्या पुण्यात सर्वाधिक म्हणजे चौदाशे रुग्णांचे निदान झाले. राज्यातील जिल्ह्यांमध्ये डेंगीचे सर्वांत जास्त रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची नोंद आरोग्य खात्यात झाली.

पुणे- डेंगीच्या एडिस इजिप्ती डासांनी राज्यात सर्वाधिक डंख पुणेकरांना केलाय. त्यामुळे डेंगीच्या तापाने पुणेकर फणफणले आहेत. लांबलेला पाऊस, डासांची बदललेली उत्पत्तिस्थळे आणि सुरुवातीला डासांची पैदास रोखण्यात आलेले अपयश, ही या मागची कारणे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात वर्षभरात डेंगीचे १४ हजार ८८८ रुग्ण आढळले. त्यापैकी एकट्या पुण्यात सर्वाधिक म्हणजे चौदाशे रुग्णांचे निदान झाले. राज्यातील जिल्ह्यांमध्ये डेंगीचे सर्वांत जास्त रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची नोंद आरोग्य खात्यात झाली. पुणे आणि कोल्हापूरच्या शहरी आणि जिल्ह्यामध्ये डेंगीचा ताप वाढला आहे. 

लांबलेला पाऊस
हा डासांमुळे पसरणारा आजार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत पाऊस पडत होता. इतकेच नाही, तो अनियमित होता. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीची वेगवेगळी स्थाने निर्माण होतात. विविध ठिकाणी पाणी साचते. त्यातून डासांची पैदास होण्यास पोषक वातावरण मिळते. त्याचा थेट परिणाम रुग्णांची संख्या वाढण्यात होतो. पुण्यात गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही पावसाची नोंद झाली. त्याचा हा परिणाम दिसतो, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

प्रयोगशाळांचे जाळे
‘राष्ट्रीय विषाणू संस्था’सह (एनआयव्ही) डेंगीचे अचूक निदान  करण्यासाठी ४२ प्रयोगशाळांचे जाळे राज्यभर निर्माण केले आहे. त्यामुळे डेंगीचे निदानाची गुणवत्ता वाढली. डेंगीचे सर्वेक्षण वाढले. त्यामुळे प्रयोगशाळांकडे तपासण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या रक्त नमुन्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. राज्यात २०१८ मध्ये एक लाख २१ हजार ५१५ रक्त नमुने तपासण्यात आले. त्याचे प्रमाण २०१९ मध्ये सुमारे आठ हजारांनी वाढून एक लाख २९ हजार ४६४ झाले. या सर्व प्रयोगशाळांमध्ये डेंगीची पूर्णतः मोफत तपासणी होते. सरकारी व्यवस्थेत कार्यरत असलेल्या ४२ प्रयोगशाळांमुळे लवकर निदान आणि त्यावर आधारित उपचार करणे शक्‍य होते. 

पुण्यात का वाढला डेंगी?
नोव्हेंबरअखेरपर्यंत पाऊस पडला
बांधकामाची ठिकाणापेक्षा घरांमध्ये डासांची पैदास वाढली
सोसायट्यांच्या परिसरातील काचा, टायर, नारळाच्या करवंट्यांमध्ये साचलेल्या पाण्यात डासोत्पत्ती

राज्यात २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते; पण, गेल्या वर्षी मृत्यूचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात यश आल्याचे दिसते.
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य खाते, महाराष्ट्र राज्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 thousand 888 dengue patients found in maharashtra