esakal | मराठमोळ्या रीवाचा जागतिक गौरव; डायना पुरस्काराने सन्मान
sakal

बोलून बातमी शोधा

riva-tulpule

घरातील ई-कचरा बाहेर फेकून देऊ शकत नाही. मग त्याचे करायचे काय, असा प्रश्न तिला काही वर्षांपूर्वी पडला आणि तिचा ई-कचऱ्याबाबतचा शोध सुरू झाला. तिने पहिल्या वर्षात एक टन ई-कचरा जमा केला. 

मराठमोळ्या रीवाचा जागतिक गौरव; डायना पुरस्काराने सन्मान

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - दुबईस्थित रीवा तुळपुळे या अवघ्या चौदा वर्षांच्या मराठी मुलीला जागतिक पातळीवरील मानाचा "डायना पुरस्कार 2020' देऊन गौरविण्यात आले. गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून तिने ई-कचरा या विषयी जनजागृती आणि पुनर्वापर या बाबत दुबईमध्ये चळवळ उभी केली आहे. या कामाची दखल घेत तिला प्रिन्सेस डायना यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार देण्यात आला आहे. 

मूळचे पुण्याचे; पण सध्या दुबईस्थित असणारे मराठी उद्योजक राहुल तुळपुळे यांची ती कन्या आहे. सध्या ती दुबईमधील जेम्स मॉर्डन ऍकॅडमी आयसीएसई बोर्डाच्या शाळेत दहावीचे शिक्षण घेत आहे. घरातील ई-कचरा बाहेर फेकून देऊ शकत नाही. मग त्याचे करायचे काय, असा प्रश्न तिला काही वर्षांपूर्वी पडला आणि तिचा ई-कचऱ्याबाबतचा शोध सुरू झाला. तिने पहिल्या वर्षात एक टन ई-कचरा जमा केला. त्यानंतरच्या वर्षात तिने तीन ते चार टन कचरा जमा केला. सध्या वेगवेगळ्या शहरांतील आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत काम करत असून, त्यांनी एकत्रितरीत्या तब्बल 20 टन ई-कचरा जमा केला आहे. त्यांनी "एन्व्हायरो सर्वे' यांच्या समवेत ई-कचऱ्याच्या पुनर्वापराबाबत करार केला आहे. त्यानुसार काम सुरू आहे. ई-कचरा गोळा करण्यासाठी तिने दुबईमधील कार वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या हुबून ट्रान्स्पोर्टचे सहकार्य घेतले. याच वाहतूक सेवेने डायना पुरस्कारासाठी रीवाचे नाव सुचविले आणि तिला हा पुरस्कार मिळाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


रीवाचे आजवरचे उपक्रम 
- शहापूर येथील आदिवासी मुलींमध्ये मासिक पाळीबाबत जनजागृती आणि सॅनिटरी पॅडचे वाटप 
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "काईन्डनेस पॅक' (धान्याचे पॅक) भारतीय दूतावासाच्या कामगार विभागाला दिले 

डायना पुरस्काराने मला प्रोत्साहन मिळाले आहे. पुरस्काराच्या निमित्ताने अनेकांशी संपर्क वाढला. यापुढे मी आणखी जोमाने काम करणार आहे. शहापूर येथील आदिवासी मुलींचे प्रश्न जाणून घेताना त्यांना अनवाणी पायपीट करावी लागत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्यासाठी "स्माइलिंग फूट' उपक्रम राबविणार आहे. जवळपास 600 मुलींना शूज देणार आहे. 
- रीवा तुळपुळे, पुरस्कार्थी 

loading image